

Hingoli Earthquake: हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात अवघ्या काही तासांत चार वेळा जमिनीला कंप जाणवला. यातील पहिल्या धक्क्याची राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडे ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. या घटनेमुळे हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शनिवारी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या धक्क्यानंतरही भूगर्भातील हालचाली थांबल्या नाहीत. सकाळी ९.४३, ९.५१ आणि १० वाजता पुन्हा कंप जाणवला.
या धक्क्यांपैकी पहिला धक्का ३.३ रिश्टर स्केलचा असल्याचे अधिकृतरीत्या नोंदवण्यात आले आहे. त्यानंतर जाणवलेल्या धक्क्यांची तीव्रता तुलनेने कमी होती. मात्र सलग कंप जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली.
भूकंपाचा धक्का जाणवण्यापूर्वी किंवा त्याच वेळी काही भागांत जमिनीखालून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. घरातील भांडी, लाकडी वस्तू आणि इतर साहित्य हलल्याने अनेकांना भूकंपाची तीव्रता जाणवली.
अचानक घरातील वस्तू हादरू लागल्याने अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडणे पसंत केले. काही ठिकाणी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन नागरिक मोकळ्या जागेत गेले. काही काळ नागरिक रस्त्यावर आणि खुल्या परिसरात थांबले होते.
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी रात्रीही जमिनीला कंप जाणवला होता. १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.४१ वाजता वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात जमिनीखालून आवाज आल्याचे आणि धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले होते. मात्र त्या घटनेची सिस्मोग्राफवर अधिकृत नोंद झाली नव्हती.
या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांच्या आत शनिवारी सकाळी भूकंपाची अधिकृत नोंद झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
हिंगोलीतील भूगर्भीय हालचालींचा परिणाम नांदेड जिल्ह्यातही जाणवला. सकाळी ९.४३ वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणी जमीन हादरल्याचे नागरिकांनी सांगितले.
अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेकांनी मोकळ्या जागेचा आधार घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
हिंगोली परिसरात यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे शनिवारी सलग चार धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये जुलै महिन्यातील घटनांची चर्चा सुरू झाली. वारंवार जाणवणाऱ्या या भूगर्भीय हालचालींमुळे भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे का, अशी भीती काही नागरिक व्यक्त करत आहेत.
मात्र कमी तीव्रतेचे धक्के जाणवणे म्हणजे मोठा भूकंप होणारच, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी जाणवलेल्या धक्क्याची तांत्रिक नोंद झाली नव्हती. मात्र शनिवारी सकाळच्या भूकंपाची ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, हिंगोली आणि नांदेड जिल्हा प्रशासनाने महसूल आणि पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता सुरक्षित मोकळ्या जागेत जावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.