

Kumkum Mohod Wins Historic Gold: अमरावतीच्या मातीतून आर्चरीचे धडे घेतलेल्या अवघ्या १७ वर्षांच्या कुमकुम मोहोदने आशियाई स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या अनुभवी ओह येजिनचा पराभव करत कुमकुमने महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय आर्चरीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे.
कुमकुमच्या या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला आर्चर ठरली आहे. जवळपास ४८ वर्षांनंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे.
विशेष म्हणजे कुमकुमचा हा प्रवास अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरू झाला. अमरावतीमध्ये बांबूच्या कामठ्यांपासून तयार केलेल्या धनुष्यावर सराव करणाऱ्या या मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आता देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या मेहनतीचे आणि सातत्याचे हे यश मानले जात आहे.
अंतिम सामन्यात कुमकुमसमोर दक्षिण कोरियाची अनुभवी खेळाडू ओह येजिन होती. सुरुवातीचे काही क्षण कुमकुमच्या अपेक्षेप्रमाणे गेले नाहीत. पहिल्या दोन सेटमध्ये तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे एक वेळ अशी आली की कुमकुम १-३ अशा पिछाडीवर होती.
मात्र, या परिस्थितीतही तिने संयम सोडला नाही. तिसऱ्या सेटमध्ये कुमकुमने जबरदस्त पुनरागमन केले. तिच्या तीनही बाणांनी अचूक निशाणा साधला. तिने हा सेट ३०-२९ असा जिंकत सामन्यात पुन्हा रंग भरला आणि स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला.
चौथ्या सेटमध्ये पुन्हा एका चुकीमुळे कुमकुमला नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे ती ३-५ अशी पिछाडीवर गेली. आता सुवर्णपदकासाठी तिला शेवटच्या सेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे होते.
पाचव्या सेटमध्ये कुमकुमने आपला सगळा अनुभव आणि आत्मविश्वास पणाला लावला. दबाव वाढलेला असतानाही तिच्या हातातील बाण लक्ष्यापासून ढळला नाही. तिने परफेक्ट निशाना साधत निर्णायक सेटमध्ये आपली ताकद दाखवून दिली.
या कामगिरीमुळे सामना ५-५ असा बरोबरीत आला आणि सुवर्णपदकाचा निर्णय 'शूट-ऑफ'मध्ये करण्याची वेळ आली.
शूट-ऑफ म्हणजे दोन्ही खेळाडूंना मिळणारी एकच निर्णायक संधी. या एका बाणावर संपूर्ण सामन्याचा निकाल अवलंबून होता. अशा क्षणी दक्षिण कोरियाच्या ओह येजिनला ८ गुण मिळाले. त्यानंतर कुमकुमने लक्ष्याचा वेध घेतला आणि पुन्हा एकदा १० गुणांची कमाल केली. कुमकुमच्या या परफेक्ट शुटमुळे भारताच्या खात्यात ऐतिहासिक सुवर्णपदक जमा झाले.
आशियाई स्पर्धेतील कुमकुमचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी तिने अंकिता भगत आणि किर्ती शर्मा यांच्यासोबत महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
याशिवाय २ ऑक्टोबर रोजी कुमकुमने धीरज बोम्मदेवरा याच्यासोबत मिश्र रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. त्यामुळे या स्पर्धेत तिच्या नावावर आता दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके झाली आहेत.
कुमकुमची कहाणी केवळ एका सुवर्णपदकाची नाही. मर्यादित साधनांपासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
अमरावतीमध्ये बांबूच्या कामठ्यांपासून बनवलेल्या धनुष्याने सराव करणारी कुमकुम आज जगातील सर्वोत्तम आर्चर्ससमोर उभी राहून विजय मिळवत आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी तिने दाखवून दिले की, मोठे स्वप्न पाहण्यासाठी मोठ्या शहराची किंवा महागड्या साधनांचीच गरज असते असे नाही. मेहनत, चिकाटी आणि योग्य संधी मिळाली तर छोट्या शहरातून आलेला खेळाडूही इतिहास घडवू शकतो.
कुमकुमच्या या ऐतिहासिक सुवर्णकामगिरीमुळे आता तिच्या ऑलिम्पिक प्रवासाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.