

३० सप्टेंबर १९९३ हा दिवस आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. लातूर आजचे धाराशिव त्यावेळेसच्या उस्मानाबादच्या भूमीला हादरवून सोडणाऱ्या त्या भूकंपाचा प्रत्यक्ष अनुभव मला कळंब येथे आला. त्यावेळी मी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होतो आणि कळंबमध्येच राहत होतो.
त्या रात्री साधारण एक ते दोनच्या सुमारास अचानक जमिनीच्या पोटातून गडगडल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. सुरुवातीला नेमके काय घडत आहे, हे काहीच समजत नव्हते. आवाज कुठून येतोय, याचा अंदाज लागत नव्हता. काही क्षणांतच घरातील वस्तू हलू लागल्या आणि घर अक्षरशः हादरू लागले.
त्या काळात भूकंप म्हणजे नेमके काय, त्याची तीव्रता कशी असते, तो कसा जाणवतो, याची फारशी माहिती सामान्य माणसाला नव्हती. मात्र, शालेय पुस्तकात भूकंपाविषयी वाचलेले असल्याने माझ्या लक्षात आले की, हा भूकंप असू शकतो.
क्षणाचाही विलंब न करता मी घराबाहेर पडलो. बाहेर आलो तर कळंबमधील जवळपास सर्वच नागरिक घराबाहेर आलेले दिसले. कुणाच्या चेहऱ्यावर भीती होती, कुणी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर आणत होते, तर कुणी नेमके काय झाले याचा अंदाज घेत होते.
त्या क्षणी पहिल्यांदाच पुस्तकात वाचलेला ‘भूकंप’ प्रत्यक्ष अनुभवत होतो. जमीन हलत होती. घरांची कंपने जाणवत होती. काही क्षणांसाठी आपण उभे आहोत की जमीनच हलत आहे, याचे भान राहत नव्हते. आजूबाजूला भीतीचे वातावरण होते. कुणालाही पुन्हा घरात जाण्याची हिंमत होत नव्हती.
नंतर हळूहळू या भूकंपाची तीव्रता आणि त्याने केलेल्या विध्वंसाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. किल्लारी आणि सास्तूर परिसरात मोठी जीवितहानी झाल्याचे समजले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. काही क्षणांत अनेकांचे आयुष्यच बदलून गेले होते.
कळंबमध्ये आम्ही भूकंपाचे हादरे अनुभवले; मात्र त्याचा केंद्रभाग असलेल्या गावांतील परिस्थिती किती भयावह असेल, याची कल्पनाही करवत नव्हती. त्या दिवसानंतर भूकंप हा माझ्यासाठी केवळ पुस्तकातील एक धडा राहिला नाही. तो माझ्या आयुष्याचा प्रत्यक्ष अनुभव बनला.
आज इतकी वर्षे उलटून गेली, तरी ३० सप्टेंबरची ती रात्र आठवली की अंगावर शहारे येतात. रात्रीच्या शांततेला चिरत आलेला तो गडगडाट, हलणारे घर, बाहेर धावून आलेले नागरिक आणि चेहऱ्यावर दिसणारी भीती हे सगळे आजही स्मरणात ताजे आहे. त्या भूकंपाने एक गोष्ट मात्र कायमची शिकवली माणूस कितीही मोठी स्वप्ने पाहत असला, कितीही प्रगती केली असली, तरी निसर्गाच्या एका क्षणाच्या शक्तीसमोर तो किती असहाय्य ठरू शकतो.
३० सप्टेंबर १९९३...
तो केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही. तो हजारो कुटुंबांच्या आयुष्यात कायमची जखम करून गेलेला दिवस आहे आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रत्यक्ष अनुभवलेला, आयुष्यभर न विसरता येणारा काळ आहे. त्या भूकंपात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- बाळासाहेब जाधवर