हिंगोली : १ लाखाची लाच घेताना पूरच्या ग्रामसेवकास रंगेहाथ अटक

हिंगोली : १ लाखाची लाच घेताना पूरच्या ग्रामसेवकास रंगेहाथ अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील पुर येथील जलजीवन मिशनचे काम हस्तांतरीत करून घेणे तसेच नळ जोडणीसाठी आदेश देण्यासाठी १ लाखाची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास आज (दि.२६) लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. सुर्यकांत खाडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.

पुर येथील जलजीवन मिशनचे काम मंजूर झाले होते. या कामासाठी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून ४४ लाख रुपये खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या झालेले काम हस्तांतरीत करून घेण्यासाठी तसेच नळ जोडणीचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ग्रामसेवक सुर्यकांत खाडे याने संबंधित कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर कंत्राटदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याप्रकरणी माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपतचे उपाधिक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, जमादार ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, तान्हाजी मुंडे, भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, वर्णे, गोविंद शिंदे्‌, शेख अकबर यांच्या पथकाने शिरड शहापूर येथील बसस्थानकाजवळ सापळा रचला.

दरम्यान, संबंधित कंत्राटदार ठरल्या प्रमाणे ग्रामसेवकास रक्कम देण्यासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिरडशहापूर येथे आला. त्यावेळी बसस्थानकाजवळ ग्रामसेवक खाडे याने १ लाख रुपयांची रक्कम घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news