हिंगोली : स्वस्त धान्य घोटाळ्यात तत्कालीन तहसीलदारासह २० जणांवर गुन्हा

हिंगोली : स्वस्त धान्य घोटाळ्यात तत्कालीन तहसीलदारासह २० जणांवर गुन्हा
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तहसील कार्यालयातील ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन तहसीलदारासह तीन अव्वल कारकून आणि १४ स्वस्त धान्य दुकानदारांवर बुधवारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप केले होते. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुमारे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे अतिरिक्त धान्य वाटप झाल्याचे उघड झले होते. यामध्ये हिंगोली तालुक्यातील मातब्बर स्वस्त धान्य दुकानदारांचा समावेश होता. त्यानंतर पुरवठा विभागाने त्यांना नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही जणांनी धान्याची रक्कम भरणा केली आहे. दरम्यान, यामध्ये ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून आज परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, अव्वल कारकून कैलास वाघमारे, इम्रान पठाण, बी. बी. खडसे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार पी. आर. गरड, ज्ञानेश्‍वर मस्के, विनोड आडे, एस. के. पठाण, डी. एम. शिंदे, मिलींद पडघन, गणाजी बेले, गोपाल तापडीया, डी. बी. चव्हाण, गजानन गडदे, गोविंदा मस्के, पतींगराव मस्के, तालुका खरेदी विक्री संघ दुकान चालकासह तीन महिला दुकानदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, अशोक कांबळे, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सेनगाव तालुक्यातील सुमारे २ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचा तपास सुरु असतांना आता हिंगोली तालुक्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील काळात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात अनेक मातब्बर दुकानदारांचा सहभाग असल्याचे महसुल विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. मात्र या दुकानदारांना अभय देण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या दुकानदारांनी अतिरिक्त धान्य वाटपाचे पैसे भरल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे तालुक्यातील खेर्डावाडी येथील स्वस्त धान्य दुकान होते. त्यांच्याकडूनही अतिरिक्त धान्य वाटप झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news