औरंगाबाद : कन्नडमध्ये मोबाईलच्या खोक्यात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

औरंगाबाद : कन्नडमध्ये मोबाईलच्या खोक्यात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ
Published on
Updated on

कन्नड : पुढारी वृत्तसेवा : शहरातील चाळीसगाव रोडवरील पंजाब नॅशनल बँकेच्या काही अंतरावर असलेल्या विश्वकर्मा फर्निचर दुकानाजवळ मोबाईलच्या खोक्यामध्ये गावठी बॉम्ब आढळून आला. ही घटना आज (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास समोर आली. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर बॉम्ब पथकाने बॉम्ब निकामी केल्यानंतर नागरिक व पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

शहरातील चाळीसगाव रोडवरील विश्वकर्मा फर्निचर दुकानाचे मालक किरण राजगुरू सकाळी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाच्या बाहेरील टेबलावर मोबाईलचे खोके दिसले. त्यांनी ते खोके उघडून पाहिले असता त्यांना बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू आढळून आली. ते घाबरले असता त्यांनी तत्काळ त्यांच्या भावाला फोन केला व दुकानात बोलावून घेतले. भाऊ किशोर राजगुरू यांनी तत्काळ ही घटना कन्नड शहर पोलीस ठाण्यात कळवली त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. आणि परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यास सांगितली. औरंगाबाद येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. पथकाने बॉम्ब निकामी केला. शहरात बॉम्ब सापडल्याची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.

यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथक औरंगाबाद येथील शहर पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर, सुनील दांडगे, पोलीस नाईक रामचंद्र म्हात्रे, धरमसिंग डेडवाल, राम गोरे, श्वान हस्तक रोहित जाधव, चालक मंगलसिंग जारवाल, बॉम शोधणारा श्वान (डॉग) प्रिन्स यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यानी बॉम्ब निकामी केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news