खूषखबर… मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात | पुढारी

खूषखबर... मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याने महाराष्ट्रातही तो वेळेआधी पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र, आपल्या लहरी स्वभावाची चुणूक त्याने दाखवून दिली आणि त्याची पावले मंद पडू लागली. महाराष्ट्राच्या सीमेवर तो सुमारे आठवडाभर थांबला. त्यामुळे आणखी काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत असतानाच त्याने पुन्हा सर्वांना झुकांडी दिली आणि त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे पुणे वेधशाळेने गुरुवारी जाहीर केले.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून कट्टर समर्थकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुढील दोन दिवसांत धडक मारणार

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसांत संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा काही भागांत तो धडक मारणार आहे. मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्याने राज्यात मान्सूनपूर्व सरीही जोरदार बरसण्यास सुरूवात होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण असेल, तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Ambani-Adani : अंबानी-अदानींना धक्का, 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर!

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस शक्य

मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून, अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे; पण शुक्रवारपासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. उत्तर कोकणात गुरुवारपासून १२ जूनपर्यंत पाऊस पडेल. घाटमाथ्यावरच्या काही ठिकाणांवरही मुसळधार पाऊस होईल, तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

दक्षिण कोकणात दोन दिवस तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला असून, १० आणि ११ जूनला बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातल्या काही भागांमध्ये मात्र उष्णतेची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला असून, नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो.

Back to top button