भंडारा : सेलिब्रेशन बेतलं जीवावर; वैनगंगेत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी

भंडारा : सेलिब्रेशन बेतलं जीवावर; वैनगंगेत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास माडगी नदीपात्रात घडली. निखील महादेव बालगोटे ( वय१७, रा. गुरुनानक वॉर्ड, तुमसर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबबातची अधिक माहिती अशी की, बुधवारी बारावीचा निकाल लागला. त्यात निखिलला ५७ टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद साजरा करण्यासाठी निखिल निकाल लागल्यानंतर मित्रांसोबत माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला होता. याचदरम्यान निखिल हातपाय धुण्यासाठी पाण्यात गेला असता त्याच्या तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला.

निखिल बुडत असल्याचे पाहून त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी नागरिकांना बोलावले. परंतु, तोपर्यत निखिल बुडाला होता. या घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून निखीलचा शोध नदीपात्रात सुरु केला. त्यानंतर सुमारे दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले आहे.

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

१२ वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्येत गेलेल्या एका विद्यार्थिनीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. मयुरी किशोर वंजारी (वय १८, रा. लाखनी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मयुरी लाखनी येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. बुधवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल लागला. यात मयुरीला कला शाखेत ५५ टक्के गुण मिळाले. खूपच अभ्यास करुनही कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली. दरम्यान काल ४ वाजताच्या सुमारास मयुरीने विष घेतल्याचे कुटूंबियांच्या लक्षात आले. यानंतर तिला तात्काळ लाखनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिची प्रकृती गंभीर झाल्याने भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का? 

Back to top button