Imtiyaz Jaleel : उद्धव ठाकरेंच्‍या ‘त्‍या’ वक्तव्याचे स्वागत : ‘एमआयएम’ प्रदेशाध्‍यक्ष इम्तियाज जलील | पुढारी

Imtiyaz Jaleel : उद्धव ठाकरेंच्‍या 'त्‍या' वक्तव्याचे स्वागत : 'एमआयएम' प्रदेशाध्‍यक्ष इम्तियाज जलील

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शहरातील सभेत काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु जे काही मुद्दे त्यांनी सभेतील भाषणातून मांडले. त्यातील शहराच्या विकासानंतरच औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर होणार, प्रेषित पैगंबर मोहंम्मद यांच्याविषयी भाजप प्रवक्त्यांनी जे अपशब्द उच्चारले. त्यासंदर्भात भारताने नव्हे, तर भारतीय जनता पक्षाने माफी मागावी, या त्यांच्या वक्तव्याचे एमआयएम स्वागत करते, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी गुरुवारी (दि. ९) सांगितले.

त्यांचा रोष हा केवळ भाजपवरच

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेतील भाषणावर विरोधकांकडून टीका होत आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी या सभेपूर्वी जे पत्रकातून जे मुद्दे उपस्थित केले होते. त्यावरच मुख्यमंत्री बोलले, असा आरोप होत आहे. दरम्यान या सभेसंदर्भात बोलताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. जलील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे आम्ही स्वागत करतो. खरे तर शहरासाठी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. शहरातील उद्योग विकास, पाणीप्रश्न यावर ते महत्वाच्या आणि ठोस घोषणा करतील, असे वाटले होते. परंतु त्यांचा रोष हा केवळ भाजपवरच दिसून आला.

औरंगाबादच्या नामांतरावर जी भूमिका आम्ही मांडली होती. तीच मुख्यमंत्र्यांनी देखील भाषणातून मांडली. ते म्हणजे शहराचा विकास झाल्यानंतरच औरंगाबादचे संभाजीनगर होणार. शिवाय, महत्त्‍वाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहंम्मद यांच्याबाबत भाजप प्रवक्त्यांनी जे अपशब्द वापरले. त्याबद्दल भारताने नव्हे तर भारतीय जनता पक्षाने माफी मागावी. त्यांच्या या दोन्ही वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो, असे खा. जलील यांनी सांगितले. दरम्यान, शहरवासियांना मुबलक व नियमित पाणी कधी मिळणार, हे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक होते, अशी खंतही खा. जलील यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button