राणीसावरगाव, लोहा व परळी येथे ६३ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

राणीसावरगाव, लोहा व परळी येथे ६३ लाखांचा गुटखा जप्त

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्याकडून अवैध धंदा चालकाविरोधाच्या कारवाईचा बडगा सुरूच आहे. तालुक्यातील राणीसावरगाव परिसरातील गुंजेगाव टी पॉइंटवर छापा टाकून एकाकडून ४४ हजार २० रुपयाचा गुटखा पकडला होता. यातून तपासाची सूत्रे हलवत राणीसावरगाव, लोहा व परळी येथून ६३ लाखांचा  गुटखा जप्त करण्‍यात आला आहे. याप्रकरणी  तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबतची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेडचे प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी श्रेणीक लोढा यांच्या पथकांनी राणीसावरगाव, लोहा, परळी येथे छापे टाकला. या दरम्यान गुंजेगाव टी पॉईंटवर शनिवार एका व्यक्तीजवळ ४४ हजार २० रुपयांचा अवैध गुटखा सापडला.

सदर व्यक्तीची चौकशी करत असताना मिळालेल्या  माहितीवरुन पथकाने नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे छापेमारी करत ६३ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. या घटनेत एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

या पथकाने सोमवारी (दि. ३०) दुपारी राणीसावरगाव येथे सापळा रचून महेश मनोहर बलसेटवार (रा. अंबेवेस गल्ली ता. परळी) याला ताब्यात घेतले. सपोनि राजकुमार पुजारी, पोलिस कर्मचारी राहुल चिंचाणे, संभाजी शिंदे, शेख ताजोद्दीन, विकास जोंधळे, मो. इमरान, शिवाजी बोमशेटे, रमाकांत शिरसाट, महिला कर्मचारी गंगासागर पौळ, वर्षा थडवे यांनी ही कारवाही केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button