पाठीवर आसूड ओढल्याशिवाय पोटाला मिळत नाही!

potraj
potraj
Published on
Updated on

भोसरी : विजय जगदाळे :

पोतराज : लुप्त होत चाललेली लोककला..

पूर्वीच्या बारा बलुतेदार ग्रामीण संस्कृतीत लोककलावंतांना मोठा मान होता; मात्र सध्याच्या 'सोशल मिडीयाच्या' जगात आपल्या विविध लोककला लोप पावत चालल्या आहेत. जसे पहाटेच्या प्रहरी हरीनाम गुणगुणत वासुदेवाची स्वारी अवतरते.

वासुदेवाच्या वाणीने प्रत्येकाची सकाळ प्रसन्न होवून जाते. त्याप्रमाणे पोतराज हा सुद्धा हा या लोककलावंतांपैकी एक हे पोतराज मरिआईचे उपासक असतात. हे आपली कला सादर करून बक्षिसी मागतात.

दिवाळीच्या सणात हे हमखास नजरेस पडतात. कला सादर करून दिवाळी फराळ मागतात; परंतु संवेदनाशून्य असलेल्या काही लोकांच्या दारातून कधी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते, तर काही सहृदय असलेल्यांच्या घरातून त्यांच्या कलेला भरपूर दाद दिली जाते.सध्या भोसरी परिसरात बिदर कर्नाटक जिल्हा येथून काही पोतराज आलेले आहेत.

त्यांची बोलीभाषा तेलगु आहे. मराठी फारशी त्यांना बोलता येत नाही. मात्र थोडी थोडी समजते. दिवाळी मागण्यासाठी खास हे कलावंत शहरात दरवर्षी न चुकता येतात.

पोत म्हणजे मशाल किंवा आडवी उभी धाग्याची वीण. राज म्हणजे राज्य करणे. पोतराज हा मूळ शब्द पोत्तुराज असा आहे. पोतराज हा मरिआई ह्या ग्रामदेवतेचा उपासक असतो. पोतराज हा मरीआईचा भगत असल्याने व मरीआई ही अतिशय कडक देवी असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे पोतराजाला कडकलक्ष्मी असे देखील म्हणतात.

त्याच्या हातात असलेल्या कोरड्याला कडक हे नाव असल्याने सुद्धा त्याला कडकलक्ष्मी म्हणत असावेत.पोतराजाचे नृत्य, पूजापद्धती, आचरण यावर द्रविडी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. पोतराज हिरव्या खंणाचा रंगीबेरंगी घागरा(लहंगा ,विजार) तो नेसतो. यातील हिरवा रंग हा कदाचित पूर्वी कमरेभोवती गुंडाळल्या जाणार्‍या कडूलिंबाच्या पाल्याचा निदर्शक असावा.

कमरेखाली घागरा त्यावर घुंगरांच्या माळा, पैंजण व हातात चाबूक/कडक धारण केलेला पोतराज कमरेच्या वर मात्र उघडा असतो.स्त्रियांप्रमाणे तो केस वाढवतो व त्याचा डोक्यावर अंबाडा घालतो. दाढी राखलेली नसते मात्र त्याला मिशा असतात.त्याच्या कपाळावर शेंदूर,हळद-कुंकू यांचा मळवट असतो.

पोतराजाच्या अंगात देवी आली म्हणून देवीला कोडे किंवा प्रश्न विचारला जातो. देवी पोतराजाच्या तोंडून उत्तर देते असे लोक मानतात. त्यानंतर पोतराजाची पूजा करून त्याला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.पोतराज हा एक प्रकारे अशी आपली लोककला सादर करून त्यावर उपजीविका करत असतो.

एकविसाव्या शतकात एकीकडे मंगळावर मानवी वस्ती करण्याची स्वप्न उघड्या डोळ्याने पाहणारे आम्ही, आमच्या या पारंपारिक लोककलावंतांकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहोत असेच म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news