जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालयात कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे व कार्यालयीन अधीक्षक राम भोसले या दोघांनी संगणमत करून आश्रम शाळेतील रोटी मेकर खरेदी प्रक्रियेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिंतूर तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी केला आहे. संबंधीतांची चौकशी करण्याची मागणीही काजळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काजळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, "कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्र परभणी व हिंगोली जिल्हा आहे. शासकीय आश्रम शाळेतील रोटी मेकर खरेदीसाठी त्यांनी जे एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवली. परंतु ही निविदा प्रक्रिया शासकीय नियमानुसार न राबविता ती बेकायदेशीरपणे रबविण्यात आली. निविदेप्रमाणे वस्तूंची खरेदी न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे रोटी मेकर खरेदी करण्यात आले आहेत. या प्रकरणाची शासकीय यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली नाही. सद्यस्थितीत हे रोटीमेकर शासकीय आश्रम शाळेत धुळ खात पडले आहेत. खरेदी केल्यापासून त्याचा उपयोग करण्यात आला नाही. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या लेखाशीर्षातून नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीचा संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याकडून अपव्यय करण्यात आला आहे. स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी लोखंडे व भोसले यांनी संबंधित पुरवठाधारकांशी संगनमत करून साधारणता ६० लाख रुपयांचा अपहार केला आहे." या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी काजळे यांनी केली आहे.