गौतम बचुटे/केज (बीड) : केज अपघात : केज तालुक्यातील साळेगाव येथे कळम रस्त्यावर पहाटे साडेपाचच्या दरम्यान मोटरसायकलला एका चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वारासह गाडीतील चालक ठार झाला असून मोटरसायकलवरील एक महिला व लहान मुलगा जखमी झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि १० नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी ६ च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर एका बलॅनो गाडी क्रं. (एम एच २५/एएस ७५९०) ने मोटरसायकलला (एम एच ४४/वाय२१५३) समोरून धडक दिली. यात मोटरसायकलवरील अमोल सत्वधर आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते (वय १७ वर्ष, रा. कळंब) हे दोघे जागीच ठार झाले. तर मोटरसायकलवरील सौ. अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर हे दोघे जखमी झाले आहेत.
हा अपघात एवढा भयंकर होता की कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटरसायकलला धडकली. त्यानंतर कार अनेक वेळा पलटी झाली. यामुळे कार चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. जखमी अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य विनोद फुलसुंदर याच्यावर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, महादेव गुजर, रुक्मिणी पाचपिंडे, अशोक गवळी, गायकवाड, शिनगारे, रमेश सानप, दिलीप गित्ते, हनुमंत गायकवाड, बाळासाहेब अहंकारे, शेख अनिस मतीन, अशोक नामदास हे सर्व पोलीस कर्मचारी हजर झाले आणि रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थ यांनी मदत केली.
एसटीचा संप सुरु आहे. यामुळे दिवाळीच्या भाऊबीजेला केज येथे आलेल्या बहिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी अमोल मोटरसायकलवरून बार्शी तालुक्याकडे जात होता. त्यात गाडी चालवण्याचे शिकत असलेल्या नवख्या चालकाने त्यांना धडक दिली. त्यातच या अभागी भावाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या गाडीने त्यांना धडक दिली ती गाडी कळंब येथील बाराते यांची असून आठ दिवसांपूर्वीच त्यांनी गाडी खरेदी केले होती. अमित बाराते हा त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन गाडी शिकत होता. त्यात त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला तर मोटरसायकलवरील अमोल सत्वधर याचाही जीव गेला.
अपघातातील मयत अमित याचे वडील जीवन बाराते याच्या वडिलांवर बायपास सर्जरी व किडनी प्रत्यारोपण झाले आहे. त्यांना अमितच्या आईची किडनी दान करण्यात आल्याने ते दोघेही आजारी आहेत.