जालन्यात ‘दोशीं’मुळे ‘लाठी’ तर बीडमध्ये ‘खाकी’ला दालबाटी – Maratha Reservation Protest | Blog

जालन्यात ‘दोशीं’मुळे ‘लाठी’ तर बीडमध्ये ‘खाकी’ला दालबाटी – Maratha Reservation Protest | Blog
Published on
Updated on

मराठा आरक्षण प्रश्‍नावर मनोज जरांगे पाटील या सामान्य कार्यकर्त्यांने एका छोट्याश्या गावात एल्गार पुकारला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज आणि त्यानंतरच्या हिंसाचार यामुळे या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. आंतरवली सराटी येथील लाठीचार्जच्या घटनेनंतर दोनच दिवसांनी बीडमधील गेवराई येथील गुळज येथे शेकडो आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केले. हे आंदोलन फार मोठे होते, पण पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थितीत हाताळली. लाठीहल्ला, हिंसक पडसाद, पोलिसांवरील रोष असे काहीही घडले नाही. उलट गेवराईत पोलिसांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचे स्वागत करत गावकऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दालबाटीची मेजवानी दिली. पोलिसांनी सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषय कशा प्रकारे हाताळले पाहिजे, याचा वस्तुपाठ बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घालून दिला. त्यामुळे जालन्यात 'दोशी' तर बीडमध्ये 'नंद' अशी प्रतिक्रिया लोकांत उमटली. ( Maratha Reservation Protest)

संथ वाहते गोदामायी… असे आपण अनेकदा वाचले अन् ऐकले देखील आहे… शांत वाहणार्‍या गोदामायीच्या दोन्ही तीरावर वसलेली गावं वारकरी परंपरेतील आहेत. आंतरवली सराटी हे गाव पाचशेपेक्षा कमी उंबऱ्यांचं गाव आहे. या गावात सनदशीर आणि लोकशाही मार्गाने मराठा आरक्षणाचे आंदोलन उभे झाले. आंदोलनाचे नेतृत्त्व मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) हा सामान्य कार्यकर्ता करत आहे.

स्वयंघोषित समाजसेवक, समाजाचे नेते, दिल्लीतील रामलीला, मुंबईचे आझाद मैदान अशा ठिकाणी आंदोलन करतात, हे आतापर्यंत आपण पाहिले आहे. पण महाराष्ट्राच्या नकाशावरील टिपक्या इतक्या गावात आंदोलन सुरू झाले, स्वत:च्या जगण्याची भ्रांत असलेला तळमळीचा चळवळ्या कार्यकर्ता या आंदोलनाचे नेतृत्व करतोय आणि मोठमोठ्या आंदोलनाची दखल न घेणारे राजकीय नेते आंतरवली सराटी या गावात रिघू लावू लागले.

२ सप्टेंबरला मी या गावात पूर्णवेळ होतो. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले, असे बरेच मान्यवर गावात येऊन गेले होते. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कुणाच्या डोक्याला दुखापत झालेली तर कुणाच्या हातापायवर जखमा झालेल्या. पाठीवर लाठ्यांचे ओळ उमटलेल वयोवृद्ध, माताभगिनींचा आक्रोश मी स्वतः अनुभवला. या हिंसाचारात जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे, हे नमूद करावे लागेल.

आंतरवली सराटी हे गाव मुख्य रस्त्यापासून दूर आहे. मराठा बांधवांनी केलेल्या आंदोलनात कोणालाही अडचण झाली नव्हती, तेथे कोणता रस्ता आडवला नव्हता की जाळपोळ झाली होती. पोलिसांनी लाठी उगारावी असे काहीच या गावात घडले नव्हते. असे असतानाही इतक्या छोट्याश्या गावात एवढा पोलिसफाटा पाठवला जातो, आणि आंदोलकांशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर पोलिस गावातून निघून वेशीवर जातात आणि परत फिरून येऊन लाठीहल्ला करतात, हा प्रकार व्हायला नको होता. ( Maratha Reservation Protest)

लाठीचार्ज झाल्यानंतर त्याची तीव्र पडसाद राज्यभर उमटले. मराठवाड्यात याची तीव्रता फारच जास्त होती. यातच गेवराई येथील गुळजमध्ये ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन पुकारले. गावातील हजारोंच्या संख्येने लोक नदीकाठी जमले होते. याचा फार मोठा ताण पोलिस प्रशासनावर होता. पण बीड पोलिसांनी हे आंदोलन अतिशय संयमाने हाताळले, याचे करावे तितके कौतुक कमीच. खाकी वर्दी आणि कोणाच्या तरी आदेशातील 'खाक्या' यातील फरक दाखवणाऱ्या या दोन घटना आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news