पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात मार्गी लावले. मराठा आरक्षण लागू करत त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणींपर्यंत टिकवून दाखवले होते. आता उपमुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो तरुणांना फायदा झाला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 'मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे, यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला गेला.
त्यामधून आतापर्यंत 5 हजार कोटींचे कर्जवाटप झाले. 67 हजार तरुणांना याचा फायदा झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना भाजप सरकारच्या काळात फडणवीस यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झाली. त्याचा फायदा 58 हजारांहून अधिक मराठा विद्यार्थ्यांना झाला आहे. 2022 पर्यंत या योजनेत 500 कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.
तसेच फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजातील तरुणांनी स्थापन केलेल्या सारथी संस्थेमार्फत 12 हजार विद्यार्थ्यांना 44.58 कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून 27 हजार 347 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला.' 'ठाकरे-पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषण करावे लागले होते,' असेही मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा