‘…नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल’ : आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे-पाटील कोण आहेत? | Manoj Jarange Patil

मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे-पाटील

वाडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमलटू लागले आहेत. या आंदोलनाचा चेहरा बनलेले नाव म्हणजे मनोज रावसाहेब जरांगे-पाटील होय. मराठा आंदोलनासाठी स्वतःची शेतजमीन विकलेले जरांगे पाटील मराठा आंदोलनातील प्रमुख नेतृत्त्व म्हणून पुढे आले आहेत. (manoj jarange biography)

जरांगे-पाटील यांची आर्थिकस्थिती तशी सर्वसामान्यच. शिक्षण म्हणाल तर १२वी पास. हॉटेलमध्ये काम करत करत त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. जरांगे-पाटील यांचे मूळगाव बीड जिल्ह्यातील मातोरी (ता. शिरूर). पण नंतर ते जालन्यातील अंकुशनगर (ता. अंबड) येथे राहातात. पूर्णवेळ मराठा समाजासाठी कार्यरत जरांगे-पाटील यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आईवडील आहेत. त्‍यांची यांची एकूण चार एकर जमीन होती, यातील दोन एकर जमीन त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे.  (Manoj Jarange Patil)

शिवबा संघटनेचा विस्तार | Manoj Jarange Patil

जरांगे-पाटील हे बघता बघता मराठी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यांना जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद चालून आले. या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला; पण २००३ला जेव्हा जेम्स लेन प्रकरणाचा वाद पेटला, तेव्हा पक्षाशी त्यांचे मतभेद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणताही तडजोड होणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्‍यांनी २०११ला त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला.

२०१४ला शिवबा संघटनेने छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी विशाल मोर्चा काढला हाेता. २०१६साली जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले, त्यांनी बीड येथील नगद नारायण गडावर ५०० फूट मोठ्या भगव्या ध्वजाची उभारणी केली. या समारंभाला विविध मठाधिपती आणि संत उपस्थितीत होते.

कोपर्डीतील आरोपींना मारहाण | Manoj Jarange Patil

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाण झाली होती ती जरांगे- पाटील यांच्या समर्थकांनी केली होती. यात बाबुराव वालेकर, राजेंद्र जऱ्हाड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या चार युवकांना दाेन वर्षांची शिक्षा झाली होती.

२०२१ला जरांगे-पाटील यांनी साष्ट पिंपळगाव येथे नव्वद दिवस ठिय्या आंदोलन केले, आणि सहा दिवस उपोषण केले. विविध मागण्या मान्य झाल्यानंतरच त्यांनी ९०व्या दिवशी आंदोलन स्थगित केले. २०२१ला तालुक्यातील गोरीगंधारी येथे मोठे आंदोलन झाले, यातून मराठा आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदत मिळून देण्यात ते यशस्वी झाले. २०२२ला अंबड तालुक्यातील भांबेरी येथेही प्रदीर्घ आंदोलन त्यांनी केले होते. २०२३ मध्‍ये त्यांनी अंबडमध्ये मोठे आंदोलन उभे केले.

पैठण फाटा येथे जनआक्रोश मोर्चा

काही दिवसांपूर्वी पैठण फाटा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढला, यात काही लाख लोक सहभागी झाले होते; पण याला सरकारकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. येथे दररोज हजारोंच्या संख्येने लोक येत होते. या आंदोलांकावर १ सप्टेंबरला पोलिसांनी लाठीमार केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news