

पुढारी वृत्तसेवा : जालन्यातील अंतरवालीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांना अमानुष लाठीमार केल्यानंतर त्यांचे संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमलटे आहेत. जालन्यातील पोलिस लाठीमारची घटना का आणि कशी घडली, याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. (Maratha Reservation Protest)
१. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २९ ऑगस्टापासून शहागड येथे जन आक्रोश आंदोलन सुरू आहे.
२. आरक्षणाच्या मागणीसाठी अंरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, पण हे जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्यात नकार दिला.
३. ३१ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गावात बैठक घेतली आणि जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण त्यांनी ही विनंती मान्य न केल्याने अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली, त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
४. उपोषणला बसलेल्या आंदोलकांना ताब्यात घेण्याच प्रयत्न वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी मध्यरात्री केला, पण गावातील महिलांचा विरोध पाहून प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
५. या घटनेनंतर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी गावात जमू लागले होते.
६. एक सप्टेंबरला आमदार राजेश टोपे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसिलदार चंद्रकांत शेळके, पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनीही जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आरक्षण समिती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक नियोजित आहे, ही बैठक होईपर्यंत आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी केली, पण ही विनंती जरांगे यांनी फेटाळली. आमदार टोपे यांनी प्रशासनाला बळाचा वापर करू नका अशा स्पष्ट सूचनाही या वेळी दिल्या होत्या.
७. या बैठकीत जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी खासगी डॉक्टर आणि एक सरकारी डॉक्टर यांनी करावी असे ठरले. जर खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारांची गरज नाही, असा अहवाल दिला तर गावातील फौजफाटा मागे घेण्यात येईल, असेही ठरले.
८. डॉक्टरांनी जरांगे पाटील यांच्यावर उपचार करावे लागतील, असे संकेत दिले. त्यामुळे पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन जरांगे पाटील यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. पण याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि पोलिसांना धक्काबुक्की झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला, तर ग्रामस्थांनीही प्रत्युत्तर म्हणून दगडफेक सुरू केली.
९. जमाव प्रक्षुब्ध झाल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसेच अश्रूधुराचे नळकांडे फोडले. १ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकारात २३ जण जखमी झाले होते.
हेही वाचा