बीड - बंदबाबत माहिती नसल्याने विद्यार्थी पोहोचले शाळेत

बीड- पुढारी वृत्तसेवा : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी बीड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील घटनेनंतर रात्री उशिरा हे आवाहन करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना याबाबत माहिती नव्हती. यामुळे सकाळची शाळेची वेळ असलेले विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना आज बंद असल्याबाबतची माहिती दिली. यानंतर हे विद्यार्थी घरी परतले.
दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आजचा बंद हा शांततेत आणि संयमाने पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने संयोजकांनी केले आहे.