Maratha Reservation Protest | जालना मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद, टायर जाळून निषेध, बीड, धाराशीवमध्ये बंदची हाक | पुढारी

Maratha Reservation Protest | जालना मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद, टायर जाळून निषेध, बीड, धाराशीवमध्ये बंदची हाक

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१) लाठीमार केला. यात काही नागरिकांसह पोलिसही जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे, तर आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या. या पार्श्वभुमीवर जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ७ वाजेपासून सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य चौकात टायर जाळून या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र होत आहे. (Maratha Reservation Protest) दरम्यान, बीड, धाराशीव, पाथार्डीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

 मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज 

मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्‍या आंदोलन सुरु होते. आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला.  त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केली असून, सोलापूर-धुळे महामार्गावर एस.टी. बस पेटवली. चार बसेसवर दगडफेक केली. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे उपोषण मागे घेण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या लाठीमाराचा निषेध केला आहे.

Maratha Reservation Protest : नागरिक आणि पोलिसही  जखमी

बेमुदत उपोषणस्थळी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. पाठोपाठ दगडफेक आणि त्यानंतर लाठीमार झाला. अनेक नागरिक आणि पोलिसही यात जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. उपोषणकर्त्यांसोबत पोलिस आणि अन्य सरकारी अधिकार्‍यांनी चर्चा केली असता त्यात तोडगा निघाला नाही.

हेही वाचा

Back to top button