पिंपरी : पालखी सोहळ्याच्या तयारीचा आयुक्तांकडून आढावा | पुढारी

पिंपरी : पालखी सोहळ्याच्या तयारीचा आयुक्तांकडून आढावा

पिंपरी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याला अनुसरुन प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे; तसेच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील स्वत: रस्त्यावर उतरून वारी बंदोबस्ताची पाहणी केली. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजनाबाबत संबंधित विभागांना त्यांनी सूचना दिल्या. पालखी सोहळा स्वागताचे व्यवस्थापन आणि नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या इंसिडेंट कमांडर तसेच इतर सर्व अधिकार्‍यांना कामकाजाचे स्वरुप याबाबत आवश्यक सूचना आयुक्तांनी दिल्या.

श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा आणि मुक्कामाच्या स्थळाची पाहणी त्यांनी केली. पालखी मार्गाची देखील त्यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, मनोज सेठीया, प्रमोद ओंभासे, संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.

स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी पालखी सोहळ्याला अनुसरुन आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पालखीचे आगमन होते. तेथे महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणार्‍या व्यवस्थेची पाहणी आयुक्त सिंह यांनी केली.

आकुर्डीतील विठ्ठल मंदिरामध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असतो. आकुर्डी येथील काही शाळांत दिंड्यांचा मुक्काम असतो. विठ्ठल मंदिरातील व्यवस्था पाहणी देखील आयुक्त सिंह यांनी केली. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

Mangal Dhillon : अभिनेता-दिग्दर्शक मंगल ढिल्लों यांचे निधन

Back to top button