छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : इन ब्रिटो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) अर्थात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने आई- वडील होण्याचे स्वप्न केंद्र सरकारच्या नवीन कायद्यानुसार आता महागले आहे. केंद्राच्या नवीन कायद्यानुसार एका व्यक्तीला एकदाच वीर्य (स्पर्म) किंवा स्त्री-बीज (उसाईट) दान करता येईल. या निर्णयामुळे स्पर्मच्या किमतीत दहा पट तर उसाईटच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.
नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यास अडचणी येणाऱ्यांचे प्रमाण सुमारे १५ टक्के आहे. अशा जोडप्यांसाठी टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ) तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. या पद्धतीच्या उपचारांत दात्याने दिलेले स्पर्म किंवा उसाईट बँकेत संकलित करून आयव्हीएफ सेंटर्सना पुरविले जातात. स्पर्म व उसाईट डोनर्सची संख्या आतापर्यंत लक्षणीय होती. त्यासाठी चांगली रक्कमदेखील मिळत असे. नवीन कायद्यामुळे या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आयव्हीएफ उपचार पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, आयव्हीएफ सेंटरचे नामकरण एआरटी क्लिनिक तर स्पर्म बँकेचे एआरटी बँक करण्यात आले आहे. नोंदणीसाठी त्यांना अनुक्रमे ५० हजार ते २ लाख, तर एआरटी बँक नोंदणीसाठी ५० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
बँकांना स्पर्म, उसाईट दात्यांचे नाव, आधार, पत्ता यासह आठ प्रकारची कागदपत्रे तयार करावी लागतील. नमुन्यांच्या एचआयव्हीसह विविध आजाराच्या चाचण्या कराव्या लागतील. बीज दात्या महिलेचा एक वर्षाचा विमा काढावा लागेल. २१ ते ५५ वयोगटातील पुरुष स्पर्म तर २३ ते ३५ वयोगटातील स्त्रीया उसाईट दान करू शकतील. एका पुरुषाला केवळ एकदाच स्पर्म तर एका स्त्रीला एकदाच उसाईट देता येईल.
नवीन नियम लागू होताच स्पर्म बँकांनी नियमित डोनर्सकडून नमुने स्वीकारणे बंद केले असून, यामुळे दात्यांच्या संख्येत घट झाली आहे. पूर्वी एका स्पर्म नमुन्यालाठी ८०० ते १००० रुपये दिले जायचे. आता त्यासाठी १० हजार रुपये मोजावे लागत आहेत. उसाईटसाठी ४० ते ५० हजारांऐवजी ८० ते १ लाख रुपये लागत असल्याचे छत्रपती संभाजीनगरातील एका आयव्हीएफ चालकाने सांगितले. राज्यातील चारपैकी तीन स्पर्म बँका छत्रपती संभाजीनगरात आहेत, हे विशेष.
हेही वाचा