IVF तंत्राचा वापर आणि त्याची गरज

डॉ. प्रवीण हेंद्रे

गर्भधारणेसाठी मूलभूत गरजा काय आहेत, हे आपण मागील लेखात पाहिलेले आहेच. थोडक्यात, 1) गर्भधारणाक्षम स्त्रीबीज (अंडे), 2) स्वत:च्या ताकदीवर स्त्री जननमार्गावाटे मार्गक्रमण करू शकणारे व स्त्रीबीजाचे कवचाला भेदू शकणारे शूक्राणू, 3) जिवंतपणाची साक्ष देऊन गर्भ ढकलत गर्भाशयापर्यंत पोहोचविणारा जननमार्ग, 4) तयार गर्भ रुजविण्याची क्षमता असलेले गर्भाशय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

निसर्गाने पुरुष जननमार्ग व स्त्री जननमार्ग अशा पद्धतीने रचना केलेली आहे की, योग्य वेळी पुनरुत्पादनासाठी स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित होण्यापासून ते जनन मार्गामध्ये गर्भ तयार होण्यापर्यंत रुजणे व त्याची वाढ होऊन योग्य वाढ झाल्यानंतर तो जीव स्वत:च्या हिमतीवर जगण्यास सक्षम झाल्यावर या जगात पाठविण्यापर्यंतची प्रत्येक अवयवाची रचना जर पाहिली, तर या विश्‍वकर्म्याच्या अफाट शक्‍तीचा आपल्याला प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक अवयवाचे कार्य एकमेकास पूरक होण्यासाठीची अंतर्गत रचना तसेच ज्या-त्यावेळी या शुक्राणू व स्त्रीबीजाभोवतीचे पूरक वातावरण (स्राव) याची महती IVF Lab सुरू करताना पदोपदी जाणवते. निसर्गाने किंवा आपण विश्‍वास ठेवत असू, तर परमेश्‍वराने या गोष्टी किती अचूकपणे करून तिथल्या तिथे चपखलपणे बसवलेल्या आहेत, याची जाणीव होते. तसेच या गोष्टी जीवमात्राला आपसूकपणे विनासायास मिळालेल्या आहेत. म्हणूनच, गर्भधारणा होणे हा निसर्गाचा नियम आहे व वंध्यत्व हे आधुनिक राहणीमानाच्या नावाखाली निसर्गाच्या संपूर्ण विरोधी जीवनशैली अंगीकारल्यामुळे वंध्यत्व समस्येला निमंत्रण दिलेले आहे. 

वंध्यत्व समस्या 100 वर्षांपूर्वीपेक्षा आज कितीतरी पटींनी वाढलेली दिसत आहे. याच्या कारणाकडे आपण खरोखर लक्ष देणे गरजेचे झालेले आहे. साधी राहणी, कमीत कमी कृत्रिम सौंदर्य प्रसाधने, कमी प्रदूषित अन्‍न व पाणी व प्रजननासाठी दिलेला गुणवत्तापूर्वक वेळ, प्रसन्‍न मानसिकता या अंगीकारल्या तर प्रजनन खूप सोपे आहे. आजच्या आधुनिक जीनवशैलीत या सर्व गोष्टींचा प्रादुर्भाव होत आहे किंवा कसे, हे प्रत्येकाने पाहणे गरजेचे आहे.

आमच्या वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीला शुक्राणूची सामान्य संख्या प्रत्येक मिलीमध्ये 8 कोटी ते 12 कोटी अशी धरली जात असे. परंतु, पुरुष प्रजननावर आज या जीवनशैली व पर्यावरणाच्या र्‍हासामुळे इतका मोठा आघात झालेला आहे की, आता WHOने ठरविलेल्या मानकामध्ये प्रत्येक मिलीतील दीड ते दोन कोटी शुक्राणूंची संख्यासुद्धा सामान्य गृहीत धरण्याची वेळ आलेली आहे. कमी वयात विविध जोडीदारांशी होणार्‍या लैंगिक संबंधातून होणार्‍या जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढलेले आढळते. आज विवाहपूर्व संबंध तसेच कायद्यानेच समलिंगी लग्‍नाला दिलेली परवानगी यामुळे जननमार्गात तयार होत असलेली अनैसर्गिक जंतुसंसर्गाच्या विकाराचा प्रजननावर दुष्परिणाम अटळ झाला आहे. 

तसेच आपण भारतीय अनुवंशिकतेने कमी कॅलरीचा आहार प्राशन करण्यासाठी जन्मला असताना आधुनिक जीवनशैली व सुधारलेली आर्थिक परिस्थितीमुळे पिष्टमय तसेच तळलेल्या पदार्थांची मुबलक उपलब्धता तसेच बदललेल्या दिनचर्येमध्ये आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी कराव्या लागणार्‍या व्यायाम, योगविद्येचा अभाव तसेच Hurry, Worry & Curry मानसिक संतुलन बिघडणार्‍या समाजातील घडामोडी, मोबाईल, कॉम्प्युटरवर बसून बैठी जीवनशैली या सगळ्याचा परिपाक म्हणजेच स्त्रीबीज निर्मितीचा अभाव PCOSचे प्रमाण आज वाढलेले दिसते. म्हणजेच, सक्षम स्त्रीबीज व पुरुष बीज तयार होत नाहीत. प्रजनन मार्ग व प्रजनन संस्थेतील जंतुसंसर्ग विकार व प्रजननासाठी दिलेला वेळ हे सर्वच आजच्या युगात गर्भधारणेविरोधात जात आहे. 

हे असेच चालू राहिले तर मानवजात काही वर्षांत नामशेष होणार नाही, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. Global Warming च्या धोक्यामुळेसुद्धा शुक्राणूच्या क्षमतेवर दुष्परिणाम अटळ आहे. 

प्रत्येक जण स्वत:च्या समस्या सोडविण्यात इतका गुंग झालेला आहे की, त्याला निसर्गावरीत होत असलेल्या दुष्परिणामकडे पाहायला वेळच राहिलेला नाही.

प्रजननाच्या समस्येकडे आज गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे. कारण, जी गोष्ट आपोआप, नैसर्गिकपणे होऊ शकते त्यावर आज समाजाला आपला पैसा व वेळ खर्च करायची वेळ येऊन ठेपली आहे. शेवटी आपण स्वत:च आपले मित्र आहोत व स्वत:च स्वत:चे शत्रू हे भगवद‍्गीतेत प्रतिपादन केलेले आहे, हे समजून वागणे गरजेचे झालेले आहे.

इतक्या प्रस्तावनेनंतर आता आपण IVF तंत्र वापरणे तसेच त्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे, ते पाहू. तर आपण पूर्वी पुरुषामध्ये शुक्राणू विकार व शुक्राणूचा अभाव (Azospermia) मध्ये IVF/ICSI तंत्रज्ञान वापरून गर्भधारणा करण्याची गरज असते. तसेच नैसर्गिक रजोनिवृत्ती किंवा अकाली रजोनिवृत्ती तसेच दोन्ही गर्भनलिका बंद असल्यास व साधारणत: सर्व उपचार व  IVF तंत्रज्ञान वापरणे गरजेचे ठरते. 

एकदा  IVF/ICSI तंत्रज्ञान वापरून गर्भधारणा करण्याचे ठरले की त्यासाठी चांगला Result हवा असेल तर कमीतकमी एक महिना नियमितपणे  IVF Center ला वेळोवेळी भेट देणे हे त्या स्त्रीला जमले पाहिजे व त्यापूर्वी या दाम्पत्यांना खरोखर गर्भधारणेसाठी प्रेरणा असणे व त्यासाठी आपली मानसिकता चांगली ठेवणे खूप गरजेचे आहे. पुरुष प्रजननासाठी मानसिकतेचा दुष्परिणाम तर होतोच; पण त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. परंतु, स्त्रीबीज निर्मितीचे कालचक्र हे जवळजवळ मासिक धर्तीवर होत असल्याने गर्भधारणेसाठी लागणार्‍या स्त्रीबीजावर मानसिकतेचे परिणाम लवकर होतो. त्यामुळे Positive चा मोठ्या मेंदूतून होणार्‍या संप्रेरक नियंत्रित करीत असते. तेव्हा त्याचे गुणवत्ताधारक स्त्रीबीज तयार होण्यासाठी एक प्रकारचा पूरक परिणाम साधता येता. तेव्हा विशेषत: स्त्रीने आपली मानसिकता प्रसन्‍न ठेवणे हे IVF/ICSI च्या यशाचे प्रथम पाऊल आहे. दाम्पत्यामधील समन्वय व एकमेकास दिलेला मानसिक आधार खूप उपयुक्‍त ठरतो. तेव्हा IVF/ICSI ची प्रणाली अंगीकारण्यावेळी त्या त्या केंद्रातील समुपदेशकाची आज खूप गरज निर्माण झालेली आहे. 

हा सगळाच उपचार थोडासा खर्चीक असल्यामुळे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणे तसेच त्याबद्दल समुपदेशन करून घेणे हे प्रथम कर्तव्य आहे. 

आणि एक गोष्ट लक्षात ठेवणे हे फार गरजेचे आहे, जेव्हा निसर्गाने गर्भधारणा होणे हा नियम असताना आपल्याला नैसर्गिक गर्भधारणा तसेच IVF गर्भधारणा झालेली नाही तर अशा परिस्थितीमुळे आज वैद्यकीय शास्त्रातसुद्धा खूपशा गोष्टी अनाकलनीय आहेत. त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे Implantation Window/ /Endometrial Reseptivity म्हणजे कोणत्या विशिष्ट कालावधीत गर्भ गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया होते, हे अचूकपणे शोधण्यावर आज वैद्यकीय शास्त्रात मर्यादा आहेत. तसेच रुजलेला गर्भ स्त्रीच्या शरीराने स्वीकारणे/नाकारणे यांची सगळी कारणमीमांसा वैद्यकीय शास्त्रात अवगत झालेली नाही.

अशा अनेक माहिती नसलेल्या अनाकलनीय गोष्टीमुळे आज IVF/ICSI तंत्राने 100 टक्‍के गर्भधारणा होणारच याची खात्री देता येत नाही. तेव्हा भगवद‍्गीतेमध्ये सांगितलेल्या श्‍लोकाप्रमाणे 'कर्मण्येवाधिका…' कर्म करणे हे मानवाच्या हातात आहे. यश देणे अथवा अपयश येणे हे केवळ आपल्या प्रारब्धावर अवलंबून असते, याचा विचार करून निष्काम कर्मयोगाचा अवलंब करून एक प्रामाणिक प्रयत्न करणे व यश प्राप्त करण्याकडे मार्गस्थ होणे म्हणजेच IVF/ICSI म्हणता येईल. मुळातच या शुक्राणू, स्त्रीबीज, गर्भनलिका मार्ग, गर्भाशय यात आज न शोधता येणारे विकार असल्याने गर्भधारणा होऊ शकलेली नसते व IVF/ICSI हा त्यावर मात करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. ज्यांना नैसर्गिक गर्भधारणा होते त्यांच्यामध्ये IVF/ICSI ने गर्भधारणा सोपी असते. त्यासाठी अगदी तरुण दाम्पत्यांमध्ये यश मिळणे सोेपे परंतु, थोडेसे वयस्क तसेच वंध्यत्वाने ग्रासलेल्या दाम्पत्यामध्ये 100 टक्के गर्भधारणेची खात्री देणे थोडे धाडसाचे म्हणावे लागेल.

आपण मानसिकता Positive ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणे व जर अपयश आले, तर त्यात खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नसतो. याची तयारी ठेवूनच या IVF/ICSI ची प्रणाली अंगीकारली तर निराश न होता जीवन जगणे शक्य आहे. त्यासाठीसुद्धा समुपदेशन, माहिती घेणे खूप गरजेचे आहे.

आता आपण IVF/ICSI साठी पुरुष व स्त्रियांमध्ये वास्तविकपणे कशी तयारी व औषधोपचार करतात, याची माहिती पुढील लेखात घेऊ.

logo
Pudhari News
pudhari.news