IVF खरोखर कोणासाठी? | पुढारी

डॉ. प्रवीण हेंद्रे

सोशल मीडियामुळे आता कोणतीही माहिती खूप लवकर इकडून तिकडे पसरते. परवा असाच एक व्हिडीओ पहायला मिळाला व आपला आहार किती प्रकारे दूषित झाला आहे, याचे त्यात विवेचन होते. जमिनीत वापरलेली रासायनिक खते, पिकावर मारलेली कीटकनाशके, तृणनाशके, ऑक्साईम्सचा तर या आहारामध्ये समावेश तर आहेच, परंतु कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे तजेलपणा दिसावा म्हणून वापरलेले थरु पासून ते कृत्रिम रंग व सॅकरिनपर्यंतचा सर्रास वापर होत असल्याने आपल्या शरीरावर व मुख्यत्वे प्रजनन प्रक्रियेवर गंभीर परिणाम झालेले आढळतात.

लहानपणी झालेले गालगुंड (Mums) मुळे वृष्णाच्या शुक्राणू निर्मितीवर विपरीत परिणाम होतो व Obstructive Azoospermia(शुक्राणूची विर्यामधील कमतरता) होऊन बसते. त्याचप्रमाणे जांघेतील हर्नियाच्या शस्त्रक्रियेवेळी शुक्राणू वाहिनीस इजा पोहोचली तरी शुक्राणू वहन थांबते व अशा मुलांना मोठेपणी Obstructive  ला सामोरे जावे लागते. वृषणाची उत्पत्ती पोटात होते व आईच्या पोटात मूल असते, तेव्हा साधारण 32 आठवड्यांत ही वृषणे अंतिम ठिकाणी म्हणजे शरीराबाहेरील पिशवी (Scrotum) मध्ये पोहोचतात. परंतु, काही अनाकलनीय कारणाने दोन्ही वृष्ण जर पोटातच राहिले, तर ते शरीराच्या उष्ण तापमानात राहतात. जेणेकरून त्यामध्ये शुक्राणूची उत्पत्ती होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये लहानपणीच हे वृष्ण Scrotum मध्ये आणावयाची शस्त्रक्रिया करणे (Orchiopexy) अपरिहार्य आहे. तसेच दोन्ही वृष्णाला पिळ पडणे (Tortion) किंवा जंतू प्रादुर्भावामुळेसुद्धा शुक्राणूच्या प्रमाणावर (Epidedymo orchitis) विपरीत परिणाम झालेले आढळतात. 

आताAzoospermia मध्ये PESA (शुक्राणू वाहिनीतील शुक्राणू इंजेक्शनद्वारे काढणे) तसेच शुक्राणू वाहिनीमध्ये शुक्राणू जर मिळाले नाहीत, तर सरळ वृष्णातून तुकडा काढून तो सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे शुक्राणूचा शोध घेऊन त्यातील प्रजननक्षम शुक्राणू काढता येतात. अशक्यप्राय वाटणारी अपत्यप्राप्ती आज ICSI व PESA, TESA & MESE द्वारे आपल्या आवाक्यात आली आहे, हे तंत्रज्ञानाचे खरोखर यश आहे. तर शुक्राणू अत्यल्प असण्यापासून त्यात विविध दोष उपचाराअंती जर दूर होऊन अपत्यप्राप्ती झाली नसेल, तर  ICSI / IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा शक्य झालेली आहे. हा उपचार थोडा खर्चीक आहे. परंतु, ज्यांना Donor Sperm डोनरचे शुक्राणू वापरून गर्भधारणा करावयाची आहे, त्यांना AID (Artificial Insemination Donor) द्वारे गर्भधारणा शक्य आहे. त्यासाठी IVF करण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे मूल असावे वाटते, त्यासाठी आता हे तंत्रज्ञान सगळीकडे उपलब्ध झालेले आढळते.

IVF / ICSI करण्यासाठी ही पुरुषामधील प्रमुख कारणे आपण पाहिली. स्त्रीला IVF / ICSI ची गरज आहे, हे जाणून घेण्यापूर्वी आपण PESA, TESA व MESA बद्दलची सखोल माहिती करून घेऊ. झएडअ (Percutaneous Epididyamal Sperm aspiration) या सर्व प्रणालीची माहिती समजून घेण्यापूर्वी आपण पुरुष जननेंद्रियाची मूलभूत माहिती करून घेऊ. पुरुष जननेंद्रियामध्ये तीन वेगवेगळे घटक आहेत. 1) वृषण – Testes  जेथे शुक्राणूची तसेच पुरुष संप्रेरकांची उत्पत्ती होते. 2) वहन करणारी यंत्रणा 3) शिश्‍न म्हणजेच पुरुष बाह्य जननेंद्रीय वृषणापासून निघणार्‍या असंख्य नलिकांचे पूंज म्हणजे Epididymis या Epididymis मधून एकत्र होऊन त्याचे शुक्राणूवाहिनी अर्थात तरी Vas deference ही शुक्राणू वाहिनी मूत्रनलिकेला प्रोस्टेट ग्रंथीजवळ मिळते. वृषणातून येणार्‍या शुक्राणूमध्ये Seminal Vesicle, Prostat a Bulbourethral ग्रंथीचा स्राव मिसळतो व त्याचे संपूर्ण विर्यामध्ये परिवर्तन होते. म्हणजे थोडक्यात शरीराबाहेर लोंबत असलेल्या वृषणापासून निघालेली शुक्राणू वाहिनी Inguinal canal द्वारे पोटात येते व प्रोस्टेट ग्रंथीजवळ मूत्रनलिकेला मिळते. जेव्हा विर्यामध्ये शुक्राणूचे प्रमाण, हालचाल कमी प्रमाणात आढळते किंवा Azoospermia मध्ये थेट शुक्राणू वाहिनीपूर्वी असलेल्या Epididimis मधून शुक्राणू घेणे म्हणजे PESA  यासाठी 26 गेजच्या सुईचा (अतिसूक्ष्म) वापर करतात. इंजेक्शनच्या सहाय्याने अशा सुईद्वारे Epididimis मधील द्रावण शोषले जाते व हे सर्व एका Petridish मध्ये घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने सक्षम शुक्राणू घेतले जातात व हे स्त्रीबीजामध्ये फलन क्रियेसाठी वापरतात.

पुढील क्रियांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण वृषणाची रचना समजून घेऊ. वृषण हे शरीराबाहेर असल्याने त्याला इजा होणे संभवते. तर अशा छोट्या-मोठ्या धक्क्यांपासून त्याला नैसर्गिक संरक्षणासाठी एक जाडसर कवच असते. (Tunica) व त्याच्या आत असंख्य नलिकेने व्यापलेले शोस्त्रीका पद्धतीचे जाळे असते. या नलिकेमध्येच शुक्राणूची निर्मिती व वाढ होत असते व या नलिका Epididimis मध्ये शुक्राणू वहन करतात. तर वरून गोटीच्या आकाराचे जरी दिसत असले, तरी Seminiferous tubules सूक्ष्म नलिकेनी गच्च भरलेले वृषण वयाच्या 10 व्या वर्षापासून अव्याहतपणे शुक्राणू निर्मिती करीत असते.

TESA (Testicular Sperm Aspiration) 21 ते 22 गेजची सुई प्रत्यक्ष वृषणामध्ये घालून त्यातून 20 मि.ली.च्या सीरिंजने त्यातील पाणी शोषतात व त्यातून बाहेर आलेल्या पाण्यामध्ये शुक्राणूचा शोध घेतला जातो व हे शुक्राणू (ICSI) सूक्ष्म सुईच्या तंत्राने स्त्री बीजामध्ये इंजेक्ट करतात व कृत्रिम गर्भधारणा केली जाते.

NAB (Needle Aspiration Biopsy) वृषणाला जागेवरली भूल देतात. 18 गेजच्या स्काल्प व्हेन नीडलच्या सहाय्याने ही सुई वृषणात प्रवेश करते. स्काल्प व्हेन सेटच्या दुसर्‍या टोकाला एक 20 मि.ली.ची सीरिंज लावून वृषणातून पाणी काढण्यासाठी सततपणे शोषणासाठी निगेटिव्ह प्रेशर लावले जाते व ही सुई पुढेमागे केली जाते व 180 अंशामध्ये फिरविली जाते. त्यामुळे वृषणातील सेमीनीफेरस ट्यूब सुईमध्ये येतात. निगेटिव्ह प्रेशर तसेच ठेवून सुई वृषणाबाहेर काढली जाते. सुईबरोबरच या सेमीनी फेरस सूक्ष्मनलिका धाग्याप्रमाणे बाहेर येतात. त्या चिमट्याच्या सहाय्याने ओढून सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे त्यातील शुक्राणू गोळा केले जातात व ICSI प्रक्रियेत त्याचा वापर करतात.

True Cut Biopsy: शरीरातील गाठी यकृत वगैरे अवयवाच्या Biopsy (परीक्षण) करण्यासाठी एक उपकरण असते ते त्याची सुई अवयव / गाठीमध्ये जाऊन एका बटणाद्वारे होणार्‍या स्वयंचलित कृतीने बाहेर येताना त्या अवयवाचा तुकडाच घेऊन येते. असा वृषणाचा तुकडा काढून तो सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे त्यातील शुक्राणू संग्रहित करता येतात.

वृषणातून शुक्राणू मिळविण्याच्या इतर पद्धती (A) टाक्याची छोटी शस्त्रक्रिया वृषणाच्या बाहेरील कातडी आवरणाला छेद देतात व वृषणाचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली शुक्राणूचे संकलन होते. ही पारंपरिक पद्धती आहे. 

(B) SSTB (Singe Seminiferom Tubule Biopsy) वृषणाबाहेरील कातडीवर छेद घेऊन वृषण उघडे केले जाते व 26 गेजच्या सुईने जिथे कोणतीही रक्तवाहिनी नाही अशा ठिकाणी वृषणामध्ये प्रवेश केला जातो. नंतर त्याच गेजचा सूक्ष्म चिमटा वृषणाच्या आत घालून एक-एक नलिका बाहेर काढून त्यातून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली शुक्राणूचे संकलन होते, असे छिद्र वृषणावर बर्‍याच ठिकाणी करतात. 

(C) Microdissection TESE : यात कातडीवर मोठा छेद घेतला जातो व आतील (Tunica) कवच पण मोठ्या प्रमाणात उघडले जाते. त्यातील असंख्य Seminiferous tabules चे जाळे दिसायला लागते. त्यातील निरोगी नलिका चिमट्याच्या सहाय्याने उचलल्या जातात व त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पृथक्करण केले जाते व फक्त निरोगी नलिकाचे परीक्षण करून त्यातील सक्षम शुक्राणू काढले जातात.

अशाप्रकारे शुक्राणूचे दोष असणार्‍या अगदी Azoospermia म्हणजेच विर्यामध्ये शूक्राणूचा संपूर्ण अभाव असणार्‍या पुरुषामध्येसुद्धा आता नवीन तंत्राद्वारे स्वत:ची अपत्यप्राप्ती होण्याची सोय उपलब्ध झालेली आढळते. परंतु, जेवढे तंत्रज्ञान प्रगत तेवढेच तज्ज्ञ तंत्रज्ञ कमी असतात. तेव्हा योग्यवेळी योग्य वैद्यकीय तज्ज्ञ मिळणे हे खरोखर भाग्याचाच भाग आहे, असे म्हणावे लागेल. अशा प्रगत तंत्रज्ञानाला त्याच्या तोलामोलाचा तज्ज्ञ शोधूनच उपचार करावे लागतात. आपण पुरुषांंमधील IVF करावी लागण्याच्या परिस्थितीची कारणमीमांसा पाहिली आता IVF प्रणाली कोणत्या स्त्रियांमध्ये वापरणे गरजेचे आहे, हे पाहू. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news