व्हिडीओ कॉल करायचा अन् विवाहितेला म्हणायचा लग्न कर | पुढारी

व्हिडीओ कॉल करायचा अन् विवाहितेला म्हणायचा लग्न कर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फोन पे व्दारे ७ हजार १५० रुपये पाठविताना मोबाइल क्रमांकातील एक आकडा चुकल्याने दुसऱ्याच व्यक्तीला पैसे गेले. हे पैसे परत मिळविण्यासाठी एका सराफा दुकानदाराच्या मदतीने जळगावातील त्यांच्या ओळखीच्या एकाचा मोबाइल क्रमांक मिळविला. विवाहितेने त्याच्याशी संपर्क साधल्यावर पैसे मिळवून देतो म्हणत त्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी फोन करून तो विवाहितेला लग्नाची गळ घालायचा. या प्रकरणी अखेर वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश पाटील (रा. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, ३२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. ती पती व दोन मुलांसह वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ५ मे २०२२ रोजी विवाहितेला एका ज्वेलर्सचे ७ हजार १५० रुपये फोन पे द्वारे पाठवायचे होते. पैसे पाठविताना विवाहितेकडून चुकून मोबाइल क्रमांकातील एक आकडा २ ऐवजी ३ टाकण्यात आला. त्यामुळे पैसे दुसऱ्याच व्यक्तीला गेले. दुसऱ्या दिवशी विवाहितेने बँकेत जाऊन अधिक माहिती घेतली. तेव्हा बाबू ननवरे (रा. चाळीसगाव) यांच्या खात्यात पैसे गेल्याचे स्पष्ट झाले. ज्वेलर्सला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने चाळीसगाव येथील ओळखीचा व्यक्ती म्हणून योगेश पाटीलचा मोबाइल क्रमांक विवाहितेला दिला. विवाहितेने त्याच्याशी बोलून सर्व घटनाक्रम सांगितला. जून २०२२ पासून विवाहिता पाटीलच्या संपर्कात आहे.

तुमचे पैसे काढून देतो. ननवरेसोबत बोलणे सुरू आहे, असे तो सांगायचा. दरम्यान, योगेश पाटीलने अनेकदा व्हॉट्सअॅप कॉल करून लगट करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने त्याला समजावून सांगितले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तो प्रत्येकवेळी रात्री व्हिडीओ कॉल करायचा आणि अश्लील बोलायचा. पती व मुलांना सोडून ये म्हणायचा. मी शिक्षक आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत, असे आमिष दाखवायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर योगेश पाटीलविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात तक्रार दिली.

Back to top button