हिंगोली : घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय पित्यानेच केला अत्याचार; नराधमास अटक | पुढारी

हिंगोली : घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय पित्यानेच केला अत्याचार; नराधमास अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : दहावीच्या परिक्षेनंतर घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय नराधम पित्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२९) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित नराधम पित्याला अटक केली आहे.

संशयित आरोपी आणि त्याची पत्नी विभक्त राहतात. त्यांची पिडत मुलगी दहावीच्या वर्गात शिकते, ती तिच्या मामाकडे शिक्षणासाठी राहत होती. मागील काही वर्षांपासून त्या मुलीसोबत पित्याने संपर्क ठेवला होता. मुलगीची दहावीची परिक्षा झाल्यामुळे तिला घरी राहण्यासाठी पाठवा अशी विनंती संशयित आरोपी पित्त्याने मुलीच्या मामाकडे केली. त्यानुसार पंधरा दिवसांपुर्वी मुलगी तिच्या वडिलांकडे राहण्यासाठी आली. १८ एप्रिल रोजी त्याने मुलीसाठी गुलाब जामून, भेळ व कलाकंद खाण्यासाठी आणले. हे सर्व पदार्थ खाल्यानंतर मुलीला झोप आली. याचा गैरफायदा घेत पित्यानेच तिच्यावर अत्याचार केला. सलग तीन दिवस अत्याचार केला, त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी घाबरली होती. तिने सदर प्रकार तिच्या मामाला सांगितला. यावरून तिच्या मामाने तिला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून नराधम पित्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्यूत मुपडे यांच्या पथकाने तातडीने संशयित आरोपी पित्याला अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button