शहीद जवानाची पत्नी लेफ्टनंट झाली; लडाखमध्ये सेवेत दाखल | पुढारी

शहीद जवानाची पत्नी लेफ्टनंट झाली; लडाखमध्ये सेवेत दाखल

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  जून 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीने लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्या आता लेफ्टनंट म्हणून लडाखमध्येच लष्कराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत आर्मी मेडिकल कॉप्सचे नाईक दीपक सिंग यांना वीरमरण आले होते. त्यांना वीरचक्र देऊन गौरवण्यात आले होते. रणांगणावर धारातीर्थी पडण्याच्या एक वर्ष अगोदरच त्यांचा रेखा सिंग यांच्याशी विवाह झाला होता. चकमकीत जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी दीपक सिंग सीमेवर पोहोचले होते. त्यांनाही चिन्यांच्या हल्ल्याचा मारा सहन करावा लागला, तशाही स्थितीत त्यांनी 30 भारतीय जवानांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.

त्यांच्या मृत्यूनंतर रेखा यांनी लष्करात भरती होण्याची इच्छा दर्शवली. योग्य त्या परीक्षा आणि चाचण्या दिल्यानंतर त्यांची लेफ्टनंट म्हणून निवड झाली. चेन्नई येथे प्रशिक्षण अकादमीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची आता थेट लडाखमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Back to top button