परभणी : मानवत नगरीत उद्या शिव-पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा | पुढारी

परभणी : मानवत नगरीत उद्या शिव-पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा

मानवत; पुढारी वृत्तसेवा : देवाधिदेव महादेव व जगतमाता पार्वती यांची संपूर्ण भारतात एकमेव अशी उभ्या अवस्थेतील मृर्ती मानवत येथे आहे. येथील उभा महादेव मंदिरात उद्या (दि.२९) चैत्र अष्टमीच्या  गोरजमुहूर्तावर शिव – पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा आयोजित केला आहे.

येथील क्षत्रियवाडी भागातील लहानश्या गल्लीत हे अनोखे शिवालय असून या ठिकाणी शिव- पार्वतीच्या उभ्या अवस्थेतील प्राचीन जागृत मृर्ती मानवतच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. या शिवालयात दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला शिव-पार्वती विवाह सोहळा लावला जातो. ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात ते भक्त विवाह सोहळ्याचे यजमानपद स्वीकारतात. यावर्षी उदगीर येथील मंदाकिनी प्रदीप बेद्रे, प्रज्ञा परिमल बेद्रे व मानवत येथील मीनाक्षी गंगाधर कंकाळ हे यजमानपद भूषवित आहेत. सर्वसामान्य विवाहसोहळ्यासारखेच सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात येते. लग्न पत्रिकाही छापली जाते. सकाळी मूर्तींना हळद लावली जाते. संपूर्ण दिवसभर लगीनघाई असते. दोन्ही मृर्तींना नवीन वस्त्रे नेसवली जातात. दुपारी वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. सायंकाळी शेवंतीच्या कार्यक्रमानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. मृर्तींना मुंडावळे बांधली जातात. सायंकाळी गोरज मुहूर्तावर होणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्यास शेकडो भाविकांची उपस्थिती असते.

पवित्र मंत्रोपचाराच्या घोषात, मंगलाष्टकाच्या स्वरात, वाजंत्रीच्या निनादात संपन्न होणाऱ्या या शिव -पार्वतीच्या विवाह सोहळ्याचे भाग्य गेल्या कित्येक वर्षांपासून मानवतच्या नागरिकांना लाभत आहे. या वर्षीही सायंकाळी ७ वाजता हा अनोखा विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी नंदकुमार स्वामी यांनी दै ‘पुढारी’शी बोलताना दिली.

            हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button