बेल्हे : पर्यावरण रक्षणासाठी तरुणाची त्रिशूर ते लडाख सायकलवारी | पुढारी

बेल्हे : पर्यावरण रक्षणासाठी तरुणाची त्रिशूर ते लडाख सायकलवारी

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा या जनजागृतीसाठी 35 वर्षीय रवी किरण या उच्चशिक्षित तरुणाने 16 फेब्रुवारीपासून त्रिशूर ते लडाख सायकलवारी सुरू केली आहे. केरळ राज्यातील त्रिशूर शहरातील रवी किरण नावाचा हा तरुण असून, तो गावोगावी भेटी देऊन ग्रामस्थांना पर्यावरणाचा र्‍हास कसा होतो, तो टाळण्यासाठी काय करावे, याविषयी माहिती देत आहे.

दि. 16 फेब—ुवारीपासून त्याने सायकलवरून जनजागृतीला प्रारंभ केला आहे. त्याचा सायकलप्रवास त्रिशूर, बंगळुरू, हम्पी, बदामी, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, आळंदी, पाबळ, मंगरूळ, बेल्हे, आळेफाटा, शिर्डी व पुढच्या राज्यांतून तो लडाखपर्यंत प्रवास करणार असल्याचे रवी किरण याने सांगितले.

सध्या जंगलांची बेसुमार तोड व वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे विविध आजार, हवामानातील बदलाने आपले कसे नुकसान होत आहे, यावर उपाय म्हणून मझाडे लावा झाडे वाचवाफ, प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आदी मार्गदर्शक सूचना शासनाच्या, सेवाभावी संस्थांच्या वतीने सातत्याने दिल्या जात आहेत.

मात्र, नागरिक या सूचनांचा अवलंब करीत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याचे रवी किरण सांगतो. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळामुळे शेतकरी देखील हतबल झाला आहे. शेतीमध्ये घातक कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. या कीटकनाशक औषधांच्या अतिवापरामुळे, रासायनिक खतामुळे शेतजमिनीचे आरोग्य बिघडल्यामुळे कॅन्सरसारखा रोग फैलावत असल्याचे त्याने सांगितले.

रात्रीचा मुक्काम पेट्रोल पंप किंवा मंदिरात
प्रवासादरम्यान रात्रीचा मुक्काम पेट्रोल पंप किंवा मंदिर या ठिकाणी तो करतो. दररोज तो 100 किलोमीटर सायकल प्रवास करीत आहे. प्रवासादरम्यान बेल्हे येथून जात असताना जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत अण्णा घोडके यांनी त्याच्या जनजागृती मोहिमेचे कौतुक करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या जनजागृती मोहिमेला शुभेच्छा दिल्या. हा युवक आळेफाटामार्गे शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Back to top button