नगर : सोशल मीडियावर पोलिसांची नजर! आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यांवर कारवाई | पुढारी

नगर : सोशल मीडियावर पोलिसांची नजर! आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यांवर कारवाई

नगर; पुढारी वृत्तसेवा : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविले जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असणार आहे. आक्षेपार्ह मजकूर पसरविणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी विविध सण-उत्सव साजरे होत आहेत.

परंतु, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत.

आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असे इशारा देण्यात आला आहे. वाद न करता पोलिसांना कळवा. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना द्यावी. त्यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉटस्अ‍ॅप मेसेज करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button