Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दानपेट्या हटविण्याचे आदेश | पुढारी

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दानपेट्या हटविण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

त्रंबकेश्वरचे मंदिर केंद्रीय संरक्षित स्मारकामध्ये समाविष्ट असल्याने मंदिर परिसरात तसेच शिव आणि गायत्री मंदिरात विविध ठिकाणी ठेवलेल्या दानपेटया ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला बजावले. त्यामुळे ट्रस्टला मंदिर परिसरात भाविकांकडून देणग्या, दान गोळा अथवा स्वीकारता येणार नाही. तसेच उत्तरेकडील गेटमधून प्रवेश करणार्‍या अभ्यागतांसाठी आकारली जाणारी सशुल्क दर्शन पध्दतही त्यांनी थांबण्यास सांगितली आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या औरंगाबाद विभागाकडून (एएसईए) त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला याबाबतचे आदेश पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात 15 मार्चला ञ्यंबकेश्वर मंदिरात एएसईएचे अधिकारी डी. एस. दानवे आणि नाशिक उपसर्कल सी.ए. दीपक चौधरी या अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी केलेल्या भेटीचा उल्लेख आहे. या महत्त्वपूर्ण आदेशात देवस्थान ट्रस्टसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. मंदिर परिसरात तसेच शिव व गायत्री मंदिरात विविध ठिकाणी ठेवलेल्या दानपेटया ताबडतोब काढून टाकण्याचे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आवारात देणगी गोळा करण्यासाठी बसविलेल्या पोर्टेबल केबिन तत्काळ प्रभावाने काढून टाकण्याचे आदेशात नमूद आहे. उत्तरेकडील गेटमधून प्रवेश करणार्‍या अभ्यागतांसाठी आकारली जाणारी सशुल्क दर्शन पध्दतही त्यांनी थांबविण्यास सांगितली आहे. केंद्र सरकारच्या एएमएसआर ॲक्ट 1958 तसेच नियम 1959 कायद्यानुसार केंद्रीय संरक्षित स्मारकामध्ये पैसे घेण्यास परवानगी नसल्याच्या नियमाआधारे अधिकाऱ्यांनी ट्रस्टला हे अनेक त्त्वात्चे आदेश बजावले आहेत.

मंदिराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात वापरात नसलेले तसेच न वापरलेल्या साहित्याचा ढीग पडलेला आहे. त्याने मंदिर परिसराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. तो तातडीने काढून टाकण्याचे सक्त आदेश सुपरिटेंडंट अर्कालॉजिस्ट यांनी बजावले आहेत. शिवरात्री उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात ठेवलेले मोबाइल वॉकवे (सेतु) स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रातून हटवण्यास सांगण्यात आलेले आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ललिता शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा करत ट्रस्टसाठी वरील स्पष्ट निर्देश प्राप्त केले आहेत. त्यामुळे ट्रस्टला दानपेट्यांच्या माध्यमातून दान स्वीकारता येणार नाही. त्यांच्या प्रदीर्घ लढयाला यश आल्याची चर्चा भक्तांमध्ये आहे. तसेच दोनशे रुपये दर्शनाबाबत न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button