खडकी : पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनांच्या गर्दीतून रस्ता कसा ओलांडावा, असा प्रश्न विद्यार्थी व नागरिकांना पडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता अरुंद असल्यामुळे त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. मेट्रोच्या कामामुळे पुण्याकडून पिंपरीकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.
तसेच बोपोडी चौकातून खडकी, येरवडा आणि पुण्याकडे जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील वाहतूकदेखील एकेरी करण्यात आली आहे, यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. बोपोडी ते खडकी बिझनेस सेंटरपर्यंतचे सुमारे दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
खडकी परिसरात अनेक शाळा असून, विद्यार्थी तसेच वयोवृद्ध नागरिक, महिलांना वाहतूक कोंडीतून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बोपोडीकडे जाण्यासाठी डॉ. आंबेडकर रस्त्याला सर्व्हिस रोड आहे. मात्र, या रस्त्याचा दुचाकी व रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. यामुळे बोपोडीकडे जाणार्या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असून, सर्विस रोड नेमका कोणासाठी आहे, असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खडकी विभागाच्या अध्यक्षा श्वेता जाधव यांनी उपस्थित केला आहे.