बीड : परळी- गंगाखेड रोडवर पोलिसांकडून ३३ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

बीड : परळी- गंगाखेड रोडवर पोलिसांकडून ३३ लाखांचा गुटखा जप्त

केज; पुढारी वृत्तसेवा : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्री गस्त घालीत असताना परळी – गंगाखेड रोडवर बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणारा टेम्पो उभा असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो असा ५१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, हेड पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपणे, वाहन चालक वंजारे हे मंगळवारी (दि.१४) रात्री गस्त घालीत होते. यावेळी आयशर टेम्पो क्र. (एच आर ६९/ डी-२३०२ ) मधून बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक होत असून हा गुटखा परळी ते गंगाखेड रोड येथील एका पेट्रोलपंपाजवळ उतरविण्यात येत आहे. अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी टेम्पो चालक साबेर सौंदाना सुन्नी (रा. सुनेडा ता. पुनाना, हरियाणा) याला ताब्यात घेत टेम्पोसह ५१ लाख रु. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चालकाची चौकशी केली असता हा गुटखा इंदोर येथील व्यापाऱ्या कडून आणण्यात आला असून परळीतील व्यापाऱ्यास देणार असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           हेही वाचलंत का ?

Back to top button