चेन स्नॅचिंगच्या लोणावळ्यात दोन घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

चेन स्नॅचिंगच्या लोणावळ्यात दोन घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

लोणावळा : लोणावळ्यात सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास खंडाळा व वलवण भागात दुचाकी गाडीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सुशीला बाळू भगत (वय 60, रा. वलवण, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वलवण गावच्या हद्दीतील रस्त्यावरून भगत या जात असताना समोरून अचानक दोन अनोळखी इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आले आणि फिर्यादीच्या गळ्यातील 2 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याची माळ हिसकावून पळाले.

तर, दुसरी घटना ही खंडाळा बॅटरी हिल परिसरात घडली. ड्युक्स हॉटेलसमोर पेरू विकणार्‍या सविता रवींद्र पोशिरे (वय 24, रा. बॅटरीहिल खंडाळा) यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. एकाच दिवशी भरदिवसा चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button