बारामती : रंग लावण्याच्या वादातून तिघांवर हल्ला | पुढारी

बारामती : रंग लावण्याच्या वादातून तिघांवर हल्ला

बारामती ,पुढारी वृत्तसेवा : रंगपंचमीच्या दिवशी (दि. 12) रंग लावण्यावरून झालेल्या वादानंतर सहा जणांनी तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार अशोक जाधव (वय 22, रा. हरिकृपानगर, बारामती) याने फिर्याद दिली.

पोलिसांनी आदित्य ऊर्फ आदेश मोहिते, यश मोहिते, साहिल लोंढे (पूर्ण नावे नाहीत, रा. आमराई, बारामती) यांसह अन्य तीन अनोळखी अशा सहा जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फिर्यादी हा त्याचे मित्र ऋतिक कांबळे, सौरभ गायकवाड यांच्यासह रंग खेळून मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर बसले होते. या वेळी सहा जण आले. त्यांच्यात व फिर्यादीत रंग लावण्यावरून वाद झाला. तो आपसात मिटला.

वाद मिटल्यानंतर वसंतनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी फिर्यादी आला असताना ही मुले कोयता व चॉपर घेऊन तेथे आली. त्यांना पाहून फिर्यादी मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर पळत गेला. दोन- तीन युवकांकडे दगड व सिमेंटचे ब्लॉक होते. साहिल लोंढे याने फिर्यादीला गाठून आज तुझा गेमच करतो, अशी धमकी दिली. तसेच तिघांनी कोयता व चॉपरने फिर्यादीच्या पाठीवर, उजव्या हातावर वार केले.

ऋतिक कांबळे यालाही साहिल याने तुझा मर्डर करून टाकतो असे म्हणत चॉपरने डोक्यात वार केला. सौरभ गायकवाड मध्ये आला असता त्याच्याही मांडीवर कोयत्याने वार करण्यात आला. अनोळखी तिघांनी दगड व सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. आजूबाजूचे लोक भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांनाही धमकावत हे सहा जण निघून गेले. त्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले

Back to top button