

मानवत; पुढारी वृत्तसेवा : शासनाने राज्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त १४ जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना धान्याऐवजी बँक खात्यात प्रतिमहिना १५० रूपये जमा करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेत मानवत तालुक्यातील एकूण ३ हजार ३९० कार्ड धारक पात्र आहेत. तालुक्यातील एकूण १५ हजार ६०० शेतकरी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा २३ लाख ४० हजारांचे अनुदान जमा केले जाणार आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज (दि. ४) पासून सुरू झाली आहे.
शासनाने १४ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्यांना जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला १५० प्रमाणे रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत मानवत तालुक्यात एकूण ३ हजार ३९० रेशनकार्ड धारक शेतकरी पात्र ठरले असून एकूण लाभार्थीं संख्या १५ हजार ६०० एवढी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरून बँक पासबुकची छायांकित प्रत जमा करण्याचे आदेश तहसीलदार प्रतीक्षा भुते यांनी दिले आहेत. प्रत्येक रेशन दुकानदाराकडे प्रत्येक लाभार्थ्यांचे विशेषतः महिला कुटुंब प्रमुखाचे आधार संलग्न खात्याची छायांकित प्रत जमा केली जाणार आहे. शनिवार (दि. ४) ते बुधवार (दि. १५) पर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी दिली.
हेही वाचा :