नगर : कॉपीकेसला जबाबदार धरू नये : नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ | पुढारी

नगर : कॉपीकेसला जबाबदार धरू नये : नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ

नगर : पुढारी वृत्त्तसेवा : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरू नये, अशा पद्धतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाला या प्रश्नाबाबत शुक्रवारी (दि.3 मार्च) भेट देऊन शिक्षण विभागाचे अधीक्षक सत्यजीत मच्छिंद्र यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, खजिनदार बाळासाहेब निवडुंगे, रामदास शिंदे, बद्रीनाथ शिंदे, अमोल ठाणगे, राहुल धावडे, एस.एस. आंधळे, बी.टी. गुंजाळ, एस.पी. चव्हाण, बी.टी. मखरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षक भरती नसल्यामुळे बर्‍याच शाळेची शिक्षक संख्या कमी आहे.
त्यामुळे पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांवर शालेय कामकाज व बोर्ड परीक्षेचे अतिरिक्त काम आलेले आहे. बोर्डाच्या परीक्षेत जर विद्यार्थी कॉपी करताना आढळला, तर पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकावर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एखाद्या गावात चोरी झाल्यास पोलिस प्रशासनावरच कारवाई करायची का? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. कॉपीकेसमध्ये शिक्षकांना जबाबदार धरून कारवाई झाल्यास अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने उर्वरित पेपरचे सुपरव्हिजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Back to top button