

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर पंचायत समितीतील अनेक विभागांच्या निकृष्ट कामांबाबत व बेशिस्त कर्मचार्यांच्या वर्तवणुकीबाबत तालुक्यातील अनेक नागरिक गटविकास अधिकार्यांकडे वारंवार लेखी तक्रारी करीत आहेत. गटविकास अधिकारी अमर माने व विस्तार अधिकारी एम. एम. कांबळे हे मात्र या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी तक्रार अर्जांना केराची टोपली दाखवित आहेत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नायगाव येथील मारुती मंदिरासमोरील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी 20 सप्टेंबर 2022 रोजी स्वप्निल पाटोळे व इतरांनी गटविकास अधिकार्यांकडे केली होती. या निकृष्ट कामाची चौकशी अद्याप झालेली नाही. मूळ ठेकेदाराने ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्याला काम दिल्याचे बोलले जाते. पोंढे येथील ग्रामसेवक वेळेवर कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहात नाहीत. वेळेपूर्वीच कार्यालयातून पलायन करतात. महापुरुषांच्या जयंतीला दांडी मारतात, आदी तक्रारी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांकडे 25 एप्रिल 2022 रोजी केल्या होत्या. या अर्जालादेखील पंचायत समिती पुरंदर कार्यालयाकडून केराची टोपली मिळाली आहे.
याचप्रमाणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पूर्व भागातील एका गावातील नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या गावातदेखील अशीच परिस्थिती आहे. ग्रामसेवक उशिरा येतात आणि लवकर जातात. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. नागरिकांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जांना वेळेवर प्रतिसाद मिळत नाही. महत्त्वाचे म्हणजे एका ठिकाणी मंजूर
झालेले काम गावातील नेते त्यांच्या वाडीवस्तीवर पळवून नेतात. याबाबत विस्तार अधिकारी एम. एम. कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी चौकशी करून कारवाई करतो, असे सांगितले.
पुरंदर पंचायत समितीचे कर्मचारी कामकाजाच्या ठिकाणी केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. यामध्ये ग्रामसेवकांची संख्या अधिक आहे. सदर कामचुकार व बेशिस्त ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी.
– पांडुरंग देवकर, सामाजिक कार्यकर्ते
या प्रकरणांची कसून चौकशी करण्यात येईल. त्यानुसार बेशिस्त व कामचुकार कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– अमर माने, गटविकास अधिकारी