वडगाव शेरी : खोदाईप्रकरणी पावणेदोन कोटींचा दंड | पुढारी

वडगाव शेरी : खोदाईप्रकरणी पावणेदोन कोटींचा दंड

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने दिलेल्या परवानगीची मुदत संपल्यानंतर आणि अटी, शर्तींचा भंग करून अनधिकृतरीत्या विमानतळ रस्त्यावर खोदाई केली जात होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकाला एक कोटी 83 लाख 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती पथ विभागाचे शाखा अभियंता दत्तायत्र तांबारे यांनी दिली.

महापालिका आयुक्तांनी गेल्या 30 मेनंतर खोदाई करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. तरी देखील गेल्या 5 व 6 जून रोजी विमाननगर परिसरातील साकोरेनगर ते विमानतळ व्हीआयपी रस्त्यावर महावितरणची केबल टाकण्यासाठी खोदाई केली होती. यामुळे रस्त्यावरील पदपथांची दुरवस्था झाली आहे. एका वेळी पन्नास मीटर खोदाई करणे, काम सुरू असताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याबाबतची दक्षता घेणे, खोदाईच्या भोवती नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, खोदाईचे काम दिवसा करावे, वाहतूक विभागाची परवानगी घेणे, आदी नियमांचे रस्ता खोदाई करताना पालन करावे लागते.

तसेच खोदाई करताना महापालिकेसाठी दोन डक्ट टाकणे देखील बंधनकारक आहे. खोदाईमुळे रस्त्यावर आलेला माती-राडारोडा उचलावा लागतो, अशा विविध अटी, शर्तींवर महापालिकेने रस्ता खोदाईसाठी पवानगी दिली होती. तरी देखील संबंधित व्यावसायिकांने हे काम करताना ‘वर्क ऑर्डर’मधील काही अटींचे उल्लघंन केले होते. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. तसेच, अनधिकृत रस्ता खोदाई करणार्‍यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने या तक्रारीची चौकशी केली होती. यात ‘वर्क ऑर्डर’ची मुदत संपल्यानंतर खोदाई केल्याचे समोर आले आहे. तसेच, महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरीत्या 2, 600 मीटर खोदाई केल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांला तीन पट म्हणजेच एक कोटी 83 लाख 30 हजारांचा दंड केला असल्याचे तांबारे यांनी सांगितले.

संबंधित व्यावसायिकाला दंडाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले आहे. दंडाची रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत बांधकाम विभागाने या व्यावसायिकाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे पत्र देण्यात येणार आहे.

                              -दत्तायत्र तांबारे, शाखा अभियंता, पथ विभाग, महापालिका

 

Back to top button