नांदेड : पोलिसांना पाहून भरधाव निघालेल्या चारचाकी वाहनावर पोलिसांचा गोळीबार | पुढारी

नांदेड : पोलिसांना पाहून भरधाव निघालेल्या चारचाकी वाहनावर पोलिसांचा गोळीबार

बिलोली, पुढारी वृत्त्तसेवा : पोलिसांना पाहून भरधाव वेगात निघालेल्या एका चारचाकी वाहनावर पोलिसांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री नरसी-बिलोली रोडवर घडली. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नरसी-बिलोली रोडवर चारचाकी वाहन क्र.एम एच 04.बीक्यू.2479 मध्ये पाच आरोपी तोंडाला दस्ती बांधून हळूहळू जात असल्याचे गस्तीवर असलेल्या रामतीर्थ पोलिस स्थानकाचे सा.पो.नि.संकेत दिघे यांना आढळून आले. दिघे यांनी संबंधित वाहनचालकाला नरसी येथील विश्रामगृहासमोर थांबण्यास सांगितले; परंतु या वाहनचालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पळवली.

यावेळी पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला. गाडी भरधाव वेगात असल्याने दिघे व त्यांच्या सहकार्‍यांनी या घटनेची माहिती आपल्या संदेशवहनावरून पोलिस स्थानकाला दिली. संबंधित वाहनचालक व त्यात बसलेल्या आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला व शासकीय वाहनाचे नुकसान केले. सा.पो.नि.संकेत दिघे यांनी आपल्या जवळ असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर केल्यानंतर भरधाव वेगात असलेले चारचाकी वाहन एका खड्ड्यात अडकल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन यातील चार आरोपी फरार झाले.

यावेळी आरोपींच्या गाडीत पोलिसांना दोरी, लाकडाचे दंडूके, लोखंडी रॉड, तलवार असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी यातील इलियास बाबू कुरेशी रा.बाजारपेठ कल्याण यास ताब्यात घेतले असून त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात आम्ही एखादा मोठा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही यावेळी सांगितले.

आरोपी इलियास कुरेशी याने दिलेल्या माहितीवरून त्याचे साथीदार फिरोज जबरा रा.भिवंडी, कय्युम भटीअली रा.मुंब्रा, एजाज कुरेशी रा.भिवंडी, ताहेर कुरेशी रा.नांदेड व अन्य एका आरोपीविरुद्ध बिलोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :

Back to top button