नगर : ऐतिहासिक वास्तूत अतिक्रमणे ; तिसगाव ग्रामस्थांकडून कारवाई करण्याची मागणी | पुढारी

नगर : ऐतिहासिक वास्तूत अतिक्रमणे ; तिसगाव ग्रामस्थांकडून कारवाई करण्याची मागणी

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ऐतिहासिक वास्तूंचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात 30 ऐतिहासिक वेशी असून, वेशींचेे जतन करण्याचे काम पुरातत्व विभागाकडे आहे. परंतु ग्रामपंचायत मालकीच्या जागेत ऐतिहासिक बारव तसेच काही वास्तू मातीत गाडून तेथे पक्की बांधकामे करण्याचा सपाटा काही व्यक्तींकडून सुरू आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तिसगावमध्ये ग्रामपंचायत मालकीची सुमारे 21 एकर जागा कागदोपत्री आहे. परंतु, आज तिसगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी साठवण टाकी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा नसल्याने सुनील पुंड या व्यक्तीने स्वतःची जागा उपलब्ध करून दिली.

21 एकर क्षेत्रात गावातील व बाहेरगावातील लोकांनी अतिक्रमणे करून जागा बळकावल्या आहेत. अतिक्रमणे करणार्‍यांचे एवढ धाडस वाढले आहे की, स्मशानभूमीवरच अतिक्रमण करून ती हद्दपार करण्यात आली. स्मशानभूमीजवळील ऐतिहासिक बारव व इतर ऐतिहासिक वास्तू मातीत गाडून तेथे पक्की बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामाधारकांवर कारवाईची मागणी सतीश साळवे यांनी केली. तिसगाव मधील गट नंबर 296 मध्ये अतिक्रमणे झाली असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाामुळे अतिक्रमणे वाढत चालली आहेत. राजकारण व मतांसाठी कोणीही तक्रार करायला अथवा कारवाईसाठी पुढे येत नाही.

तिसगावमधील अतिक्रमणांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असतानाही तिसगावमध्ये मात्र कोणालाच कशाची भीती वाट त नाही. पक्की बांधकामे केली की ग्रामपंचायतीची जागा कायमची बळकायची समजायची. गाळे बांधायचे व नंतर तेच गाळे विकून टाकायचे अथवा भाडोत्री द्यायचे, असा गोरख धंदा काही प्रवृत्तीने सुरू केला आहे.
ऐतिहासिक वास्तू देखील आता अतिक्रमण करणार्‍यांकडून नामशेष होऊ लागल्या आहेत. एकाही अतिक्रमण करणार्‍यावर ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

खंडपीठात याचिका दाखल : गारूडकर
ग्रामपंचायतीची परवानगी न घेता पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात आपण याचिका दाखल केली आहे. शासकीय जागा हडपणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. आज ग्रामपंचायतीला हक्काची जागा शिल्लक राहिली नाही, असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गारुडकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीकडे तक्रार
ग्रामपंचायतीच्या दप्तरी बारव, धार्मिकस्थळ, कोष्टी समाजाची स्मशानभूमी असा उल्लेख आहे. अशा सर्व वास्तू मातीत गाडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्की बांधकामे केली जात आहेत. या बांधकामावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केल्याचे साळवे यांनी सांगितले.

Back to top button