‘कॉपी’साठी मदत केल्यास पालक, शिक्षकांवरही गुन्हा | पुढारी

‘कॉपी’साठी मदत केल्यास पालक, शिक्षकांवरही गुन्हा

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत असून या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आठ भरारी पथके कार्यरत असतील. विद्यार्थ्याकडे परीक्षागृहात कॉपी आढळल्यास ती पुरविण्यासाठी पालक किंवा शिक्षक (पर्यवेक्षक) यांची भूमिका पूरक आढळली तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.

बारावीच्या परिक्षा मंगळवाळपासून (दि. 21) तर दहावीच्या परीक्षा दोन मार्चपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कॉपीमुक्त अभियानाची माहिती गुप्ता यांनी दिली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी गजानन सुसर, सुधा साळुंके, रावसाहेब मिरगणे उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, की विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी सरकारने कॉपीमुक्त अभियानावर भर दिलेला आहे. त्यानुसार आठ भरारी पथके तैनात केली आहे. या अभियानाचे प्रमुख जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे असतील. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचेही पथक कार्यरत असेल. बारावीचे 15 हजार 901 तर दहावीचे 21 हजार 983 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाईल. परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिघात झेरॉक्स सेंटर बंद असतील. पर्यवेक्षक तसेच परीक्षेसाठी नियुक्त कर्मचार्‍यांशिवाय कोणालाही परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश नसेल. केंद्रावर बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस कर्मचार्‍यांनाही परीक्षागृहात प्रवेश करता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. परीक्षा दालनात संबंधित शाळेऐवजी इतर केंद्रातील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनीही याची नोंद घेऊन कॉपीपासून दूर राहावे, असे आवाहन सीईओ गुप्ता यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button