फौजदाराची महिलांना अश्लील शिवीगाळ; म्हणे …पोलिसाविरुद्ध तक्रार देण्याची कोणात हिंमत आहे? | पुढारी

फौजदाराची महिलांना अश्लील शिवीगाळ; म्हणे ...पोलिसाविरुद्ध तक्रार देण्याची कोणात हिंमत आहे?

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : एसीपी विशाल ढुमे याने दारूच्या नशेत गोंधळ घालून विवाहितेचा विनयभंग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच सातारा ठाण्यातील श्रेणी उपनिरीक्षक अनिल बोडले यानेही कॉलनीतील महिलांना शिवीगाळ केली. ‘तुमच्यापैकी कोणात हिंमत आहे पोलिसाविरुद्ध तक्रार द्यायची,’ अशी धमकी दिली. मयूरबन कॉलनीत 16 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यावरही 17 फेब्रुवारीला बोडले कामावर हजर होता.

आरोपी बोडले हा सातारा ठाण्यात श्रेणी उपनिरीक्षक आहे. यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या बोडलेच्या अडचणी वाढणार आहेत. 40 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या 13 वर्षांपासून मयूरबन कॉलनीत वास्तव्य करतात. बोडले हा याच कॉलनीत बी लाइनमध्ये राहतो. तो कॉलनीत नेहमी धिंगाणा घालतो. त्याला सोसायटी कार्यालयात समज दिलेली आहे, तरीही त्याच्यात सुधारणा झालेली नाही. 16 फेब्रुवारीला सायंकाळी फिर्यादी महिला घरात असताना त्यांच्या भिंतीवर जोरात फुटबॉल मारल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बोडले भिंतीवर बॉल मारत असल्याचे दिसले. तो दारूच्या नशेत असल्याचेही त्यांना वाटले. तो अश्लील नजरेने बघत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतरही तो जवळपास 15 मिनिटे भिंतीवर जोरात फुटबॉल मारत राहिला. त्यानंतर त्याने शेजारील घराकडे मोर्चा वळविला.

तिघींच्या भिंतीला मारला फुटबॉल

अनिल बोडले याने आरडाओरड केल्यावर कॉलनीतील महिला एकत्र आल्या. त्यांच्यात चर्चा झाली. तेव्हा समजले, की तो तीन महिलांच्या घराकडे गेला होता. त्याने त्यांच्या भिंतीवर फुटबॉल मारला. एका महिलेला तर फुटबॉल फेकून मारला. तो हुकल्यावर त्या महिलेचे नाव घेऊन ‘मला बॉल दे,’ असे म्हणत एकटक बघत राहिला. त्याने वेगवेगळ्या घरी जाऊन धिंगाणा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी बोडलेचा व्हिडीओ व्हायरल

आरोपी अनिल बोडले याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तो स्वत: मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटिंग करीत असल्याचे दिसते. ही शूटिंग करीत असताना महिलांबद्दल अपशब्द बोलून ‘कोणती बाई म्हणाली, मी छेडले म्हणून,’ असे वारंवार बोलताना दिसत आहे. तसेच, शर्टची वरील तीन बटने उघडून ‘कसा दिसतो?, कसा दिसतो?’ अशी अश्लील टिप्पणी केल्याचे व्हिडीओत दिसते. तेथे उपस्थित महिलांनी शूटिंग करू नका, असे म्हटल्यावरही त्याने शूटिंग सुरूच ठेवली.

डायल 112 ला कॉल

काही केल्या बोडले शांत होत नसल्यामुळे आणि त्याचा धिंगाणा वाढत असल्याने मयूरबन कॉलनीतील महिलांनी अखेर डायल 112 ला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस आल्यावर ते बोडलेला घेऊन गेले. त्याला जवाहरनगर ठाण्यात नेले. तेथेही त्याचा धिंगाणा सुरूच राहिला. अखेर, पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यात तो दारू प्यालेला असल्याचे समोर आले. अखेर, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने बोडलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विनयभंगाचे कलम नाही

फिर्यादीत सर्व वाक्यरचना विनयभंगाच्या गुन्ह्याप्रमाणे आहे. मात्र, प्रत्यक्ष कलम लावताना विनयभंगाचे 354 हे कलम लावलेले नाही. महिलांना अश्लील बोलणे, शर्टचे बटन उघडून मी कसा दिसते, असे वारंवार विचारणे, हा सर्व प्रकार विनयभंगाच्या गुन्ह्याचा असल्याचे जाणकार सांगतात. मात्र, जवाहरनगर पोलिसांनी भादंवि कलम 294, 504, 506, 509 नुसार गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष राऊत करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button