

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : सध्या सर्व राज्याचे लक्ष हे पुण्यातील कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या ठिकाणी होत असून या दोन्ही जागेवरती भाजपला यश येणार नसल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीने कसलाही आणि कसाही प्रचार केला तरी लोकांच्या मनात आता ते नाही. या निवडणुकीत एकानं बंडखोरी केल्याने भाजपला आशा आहे; मात्र त्या बंडखोरालाही लोक जागा दाखवतील असं मधुकर चव्हाण यांनी सांगितले. मधुकर चव्हाण हे बुधवारी (दि. १५) इंदापूरमधील शासकीय विश्रामगृहात आले असता प्रसारमाध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीही काँग्रेस सोडून जावू शकत नाही
काँग्रेसमध्ये भांडण कमी आहेत; मात्र ते लावण्याचा प्रकार जास्त आहे. प्रसारमाध्यमे त्याला प्रसिद्धी देतात. भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडण नाही का? छोट्या पक्षांमध्ये नाही मात्र मोठ्या पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस ही असतेच. त्याच्यामुळे कोणी काँग्रेस सोडून जावू शकत नाही. आज आमची ओळख ही पक्षामुळे आहे. आम्ही शेतकरी माणसं होतो; मात्र काँग्रेसने आम्हाला खूप काही दिलं असं मधुकर चव्हाण यांनी सनगितले. आज मी कुठल्याही पदावर नाही मग काय मी काँग्रेसला सोडून जायचं का ? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.