धानोरा काळे; पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी जोरदार झालेल्या अतिवृष्टीने पिकात सर्वत्र पाणी साचले आहे. धानोरा काळे परिसरात चोवीस तास लोटूनही शेतातील पाणी ओसरलेले नाही. यामुळे काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, तूर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्यस्थितीत शेतात काहीच शिल्लक राहिले नसून पिकांवर संगोपनासाठी बियाणे, खते, औषधींचा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला. परंतु, हतातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे हातचे गेले आहे.
नुकसानीचे पंचनामे न करता भरीव अशी आर्थिक मदत तात्काळ द्यावी. तसेच पीकविमा मंजूर करून १००% पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरातील नद्या, ओढे ओसंडून वाहत आहेत. धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने नदीचे पात्र भरून वाहत आहे.
यामुळे शिवारातील पाणी अडवले गेले असून चोवीस तास लोटूनही पाणी कमी झाले नसल्याने शेतातील उभे असलेले सोयाबीन, कापूस, तूर, फळबाग आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यातच सोयाबीन कापणीला आल्यामुळे ते कापण्यासाठी मजुरांना ठरविले होते.
जवळपास ३००० ते ३५०० रुपये कपणीचा दर प्रति एकर निघाला आहे.
साधारण शेतकऱ्यांनी चार- पाच एकर ते दहा एकरपर्यंत सोयाबीनची लागवड केली आहे.
सोयाबीनची कापणीची उचल (मजुरी) अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे.
सोयाबीन पूर्ण पाण्यात बुडाल्याने त्या पिकाच्या शेंगा पूर्ण नासून गेल्यामुळे कापणीला महाग झाले आहे; परंतु, ठरवलेली मजुरी उचल घरूनच शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.
त्यामुळे जोरदार झालेल्या पावसाने सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
तात्काळ शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी तसेच पीक विमा तात्काळ मंजूर करून १००% नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
हेही वाचलंत का?