जालना : चाळीस क्विंटल कापसाच्या गंजीसह शेतीसाहित्य जळून खाक | पुढारी

जालना : चाळीस क्विंटल कापसाच्या गंजीसह शेतीसाहित्य जळून खाक

जळगाव सपकाळ (जि. जालना) – शेतकर्‍यांच्या पांढर्‍या सोन्याला भाव नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी भाववाढीच्या आशेने कापसाची गंजी मारुन शेतात पत्र्याच्या शेडमध्ये किंवा घरात साठवून ठेवलेला आहे. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील नंदु बुरुकुले या शेतकर्‍याने शेतात पत्र्यांच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला चाळीस क्विंटल कापूस सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. शेतातील शेती साहित्य तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेला भुसाच्या चार्‍यासह इतर साहित्य जळाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या शेतकर्‍याच्या पत्र्याच्या शेडला आग लागल्याचे कळताच शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली, आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठया प्रमाणात असल्याने तासाभरानंतर आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत शेतकर्‍यांचा कापूस जळून खाक झाला होता. सदरील शेतकर्‍याला सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Back to top button