परभणी: शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांचे जलसमाधी आंदोलन | पुढारी

परभणी: शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांचे जलसमाधी आंदोलन

मानवत; पुढारी वृत्तसेवा : आदर्श शाळा म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील इरळद येथील जिल्हा परिषद शाळेतील ६ शिक्षकांच्या झालेल्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी आज (दि.६) पासून पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी दुधना नदीच्या पात्रात बेमुदत अर्ध जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. बदल्या जोपर्यंत रद्द केल्या जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याने शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की , तालुक्यातील इरळद येथे इयत्ता १ ली १० वीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेला २०१९ मध्ये शिक्षण मंडळाने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता दिली. या शाळेत मानवत व सेलू या तालुक्याच्या ठिकाणासह आसपासच्या १० गावातील २८३ व इरळद गावातील २४१ असे एकूण ५४१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. या शाळेतील एकूण १० शिक्षकांपैकी तब्बल ६ शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या आहेत.

शाळेतील या शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर शाळेतील गुणवत्तेचा स्तर राहणार नसल्याने या सर्व शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्या, या मागण्यासाठी पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी १० दिवसांपूर्वी परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंदोलन केले होते. त्यानंतर अशोक कचरे यांनी आमदार मेघना बोर्डीकर व माजी आमदार मोहन फड यांच्या समवेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने बदली रद्द करण्याचे ठोस आश्वासन न दिल्याने आज सकाळी ११ पासून दुधना नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. तत्पूर्वी शाळेपासून दुधना नदी काठापर्यंत हलगी वाजवीत प्रशासनाच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.

दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील पवार व तालुका गटशिक्षणाधिकारी डी. आर. रणमाळे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली व निवेदन स्वीकारत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नाहीत. तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे .

शाळेसाठी लोकसहभागातून ३३ लाख निधी संकलन

इरळद येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून २००८ ते २०२२ या कालावधीत लोकसहभागातून सुमारे ३३ लक्ष रुपयांचा निधी जमा करून शाळेसाठी १ एकर १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून १२ वर्गखोल्या , १ कार्यालय , सायन्स व कॉम्प्युटर लॅब, हॅन्ड वॉश स्टेशन, मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरे व सुसज्ज इमारत उभी केली आहे .

शाळेचा नवोदय पॅटर्न जिल्ह्यात प्रसिद्ध

या शाळेत आतापर्यंत २२ विद्यार्थी नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत. तर इयत्ता ५ वी ते ८ वीमधील ६५ विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. शाळेला जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. गुणवत्तेचा इरळद पॅटर्न परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

हेही वाचा 

Back to top button