Shiv Sena Symbol Row : पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर | पुढारी

Shiv Sena Symbol Row : पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने शिवसेना तसेच निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ वर आपला दावा केल्याने हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला होता. या वादावर आयोगातील सुनावणी जवळपास पूर्ण झाली आहे.गेल्या सुनावणीत आयोगाने दोन्ही गटांना आज, मंगळवार पर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार दोन्ही गटांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता पर्यंत लेखी युक्तिवाद सादर केला. आता आयोगाच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena Symbol Row)

“मूळ पक्ष आम्हीच आहोत. त्यामुळे आम्हाला पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. बहुमत आमच्याकडे आहे”, अशी भूमिका शिंदे गटाकडून लेखी युक्तिवादातून मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.चिन्ह देताना लोकप्रतिनिधी संख्याबळ विचारात घेतले जावे.निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुराव्यांची पुर्तता केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे, असा लेखी युक्तिवाद शिंदे गटाने सादर केल्याचे कळतेय. (Shiv Sena Symbol Row)

निकाल आमच्याच बाजूने लागणार – अरविंद सावंत (Shiv Sena Symbol Row)

आम्ही सर्व पुरावे, प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले आहेत. आमदार गेले म्हणून पक्षावर हक्क सांगता येत नाही. त्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या पक्षाला चिन्ह आणि नाव मिळायला हवे. मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी आणि प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. त्यामुळे आमच्या बाजूने निर्णय लागेल. मतदारांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी निवडून दिले आहे. शरद यादवांनी लालुप्रसाद यादव यांच्या मंचावर जावून भाषण केले होते. नितीश कुमारांनी त्यामुळे पक्षद्रोहाचा मुद्दा पुढे करुन त्यांची खासदारकी रद्द केली होती. शिंदे गटाला पक्ष सोडायचा होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होते. परंतु ते तसे गेले नाही. निवडणूक आयोगात आमच्या वकिलांनी म्हणणे मांडले असल्याने निर्णय आमच्या बाजूने लागेल. मागे महाशक्ती उभी आहे म्हणून आम्ही काहीही करु शकतो, असे त्यांना वाटतय. परंतु, कायद्याच्या राज्यात न्यायाची अपेक्षा आहे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा :

Back to top button