मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार: सत्यजित तांबे | पुढारी

मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार: सत्यजित तांबे

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, त्यामुळे मी अपक्ष आहे आणि अपक्ष राहणार, यापेक्षा मी जास्त राजकीय भाषेत करू शकत नाही असे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरातील शारदा विद्यालयातील मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचाच फॉर्म भरला होता. मात्र, मला एबी फॉर्म मिळू न शकल्यामुळे मी अपक्ष उमेदवार झालो आहे. माझे वडील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर पंधरा वर्षे या पदवीधर मतदारसंघातील जनतेने प्रेम केले आहे. ते प्रेम मलाही मिळत आहे. तसेच मला सर्वच राजकीय पक्षांसह १०० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. सर्वांनी मला पाठिंबा दिल्यामुळे मी भारावून गेलो असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून माझ्या कुटुंबाला काही लोकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले, यावर अर्धसत्य समोर ठेवून बाजू मांडली गेली. शब्दाने शब्द वाढू नये, यासाठी मी मुद्दाम काही भाष्य केले नाही. जे आरोप माझ्यावर झालेत ते काँग्रेस कडून झाले नाही, तर ते काँग्रेसमधीलच काही लोकांकडून झाले आहेत. योग्य वेळ आल्यावर नक्कीच मी त्यावर सर्वकाही बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले

महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने चुरशीची लढाई झालेली आहे. मात्र मतदान प्रक्रिया संपल्यानंतर संगमनेर शहरातील शारदा विद्यालयातील मतदान केंद्रावरती अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथली तांबे या दोघी एकमेकांच्या समोरासमोर आल्या. मैथली यांनी शुभांगी पाटील यांची चौकशी करत चाय पे चर्चा केली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Back to top button