

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. यावेळी जखमी झालेल्या वृध्दाचा आज (दि.२२) मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर खूनाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आखाडा बाळापूर पोलिसांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे २८ डिसेंबर रोजी पहाटे २० ते २५ जणांनी काही घरावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हाणामारीत काठ्यांसोबत, लोखंडी रॉडचाही वापर करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, राजेश मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दहा जखमींना आखाडा बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील पाच जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले होते. यामध्ये माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेख तबदिल जखमी झाले होते. त्यांना उपचार करून घरी आणले होते. दरम्यान, रविवारी सकाळी शेख तबदिल यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी गावात भेट देत पाहणी केली.गावात शांतता असून, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान,मृतदेह शवविच्छेदनासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. त्यांचा मृत्यू मारहाणीच्या जखमांमुळे झाला किंवा अन्य कारणामुळे झाला याबाबत वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानंतरच खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.