मुंबईसाठी हिंगोलीहुन साप्ताहिक रेल्वे धावणार | पुढारी

मुंबईसाठी हिंगोलीहुन साप्ताहिक रेल्वे धावणार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे रुंदीकरण झाल्यापासून हिंगोली, अकोला, पूर्णा मार्गावर एकही लांब पल्ल्याची रेल्वे सुरू करण्यात आली नाही. तसेच कोरोना काळात सुरू असलेल्या काही रेल्वे गाड्याही बंद करण्यात आल्या होत्या. त्यावर आता पूर्ण हिंगोली – अकोला मार्गे जाहीर झालेली जालना-छपरा रेल्वे औरंगाबाद-मनमाड मार्गे वळविण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या हिंगोलीकरांनी रेल्वेचे मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाला अंशतः यश आले असून आधी अमरावती – पुणे व नंतर नांदेड-मुंबई मार्गे हिंगोली, अकोला अशी रेल्वे सुरू करण्यात आली.

जालना- छपरा रेल्वे गाडी वळविल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी हक्काच्या रेल्वेसाठी संघर्ष सुरू केला होता. यामध्ये मुंबईसाठी रेल्वे सुरू करावी तसेच इतर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिंगोली व वसमत स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या संदर्भात शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची अनेक वेळा भेट घेऊन मुंबईसह इतर रेल्वे सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी तातडीने पुणे- अमरावती – पुणे ही विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू केली. परंतु हिंगोलीकरांचा लढा सुरूच असल्याने तसेच मुंबईसाठी रेल्वे सुरू करण्यासाठी मागणी लावून धरली होती. त्यानुसार दक्षिण – मध्य रेल्वे विभागाने मुंबईसाठी जाण्या करिता विशेष साप्ताहिक रेल्वे मंजुर केली. ज्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला रेल्वे मार्गावर मुंबईसाठी साप्ताहिक विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०७४२६ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई हि विशेष गाडी नांदेड येथून ३० जानेवारी आणि ६, १३, २० आणि २७ फेब्रुवारीला दर सोमवारी रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी १.३० वाजता पोहचणार आहे. परतीच्य प्रवासात गाडी क्रमांक ०७४२७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नांदेड हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ३१ जानेवारी आणि ७, १४, २१ आणि २८ फेब्रुवारीला दर मंगळवारी दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहचणार आहे.

तसेच गाडी क्रमांक ०७४२८ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई हि विशेष गाडी नांदेड येथून दिनांक २५ जानेवारी आणि १, ८, १५ आणि २२ फेब्रुवारी, २०२३ ला दर बुधवारी रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी १.३० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नांदेड हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक २६ जानेवारी आणि २, ९, १६ आणि २३ फेब्रुवारी, २०२३ ला दर गुरुवारी दुपारी १६.५५ वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी ९.०० वाजता पोहचणार आहेत. वरील साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लासचे डब्बे राहणार आहेत.

या रेल्वेगाडी बदल हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती व हिंगोली जिल्ह्यातील तमाम व्यापारी, पत्रकार, नागरिक, विविध सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईसाठी विशेष रेल्वे मिळाल्याने ना. दानवे यांचा सत्कार

हिंगोलीकरांची प्रलंबीत मागणी पूर्ण करून नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे मुंबईसाठी विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. याबद्दल रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचा २१ जानेवारी रोजी जालना येथे गोवर्धन विरवुँâवर, नंदकिशोर तोष्णीवाल, गजेंद्र बियाणी, वसंतकुमार भट्ट, वैâलास बांगर, अ‍ॅड. अनिल तोष्णीवाल यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुंबईसाठी दैनंदिन रेल्वे सुरू करण्यास दिली सहमती

मुंबईसाठी दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती ना. दानवे यांनी शिष्टमंडळाला दिली. तसेच सुरू करण्यात येणार्‍या मुंबईच्या रेल्वेचे उद्घाटन ना. दानवे यांच्या हस्ते करण्याचे निमंत्रणही दिले असता त्यांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच शिष्टमंडळाने छपरा रेल्वे संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता छपरा रेल्वे ही देणे शक्य नसल्याचे ना. दानवेंनी सांगुन उत्तर भारतासाठी नवीन रेल्वे देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

भाजपा प्रदेशाध्यक्षांचेही मानले आभार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मध्यंतरी हिंगोलीत आले असता हिंगोलीकरांनी मुंबईच्या रेल्वे संदर्भात त्यांच्याकडे व्यथा मांडल्या होत्या. या रेल्वेचा प्रश्न सोडविण्याकरिता लवकरच रेल्वे मंत्र्यासोबत बैठक लावली जाईल, असे आश्वासन बावनकुळेंनी हिंगोलीकरांना दिले होते. बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी रेल्वेमंत्री अश्विनकुमार व प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे मुंबई रेल्वेचा प्रश्न मांडला असल्याचे बावनकुळेंनी माहिती दिली होती. त्यांनीही रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यामुळे हिंगोलीकरांनी त्यांचे आभार मानून त्यांना लेखी पत्रही पाठविले.

वेळेमध्ये बदल करण्याची मागणी

गाडी क्रं. ७४२८ – ७४२९ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते परत नांदेड साप्ताहिक धावणारी रेल्वे गाडी मुंबईला दुपारी पोहचत असल्याने शासकीय कामा निमित्ताने जाणार्‍यांना अत्यंत असुविधाजनक ठरणार आहे, सदरची रेल्वे गाडी सकाळी लवकर पोहचेल अशा रितीने वेळेत बदल करावा तसेच गाडी संख्या ०१४३९-०१४४० पुणे – अमरावती – पुणे ह्या रेल्वे गाडीचा लुज टाईम कमी करणे आवश्यक आहे, कारण सदरची गाडी हिंगोली येथे दुपारी १२ वाजता पोहचत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे सदरच्या गाडीचा लुजटाईम करून सकाळी ९ पर्यंत तरी हिंगोलीला पोहचेल असा वेळेत बदल करावा अशी मागणी केली. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनावर नंदकिशोर तोष्णीवाल, गजेंद्र बियाणी, बसंतकुमार भट्ट, अ‍ॅड. अनिल तोष्णीवाल, गोवर्धन विरकुंवर, कैलाश बांगर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Back to top button